भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेडा : नाकाडोंगरी वन परिक्षेत्रातील सहवनक्षेत्र कवलेवाडा, नियतक्षेत्र सितासावंगी येथील कक्ष क्रमांक ६५ आरएफमध्ये वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी गेलेल्या शिकाºयांचा डाव वनविभागाच्या पथकाने उधळून लावला. या कारवाईत आतापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले असून, दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. वनविभागाला २९ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास सितासावंगी येथील काही इसम वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी जंगलात गेल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहिती मिळताच नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी व वनकर्मचाºयांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पथकाने जंगल परिसरात सापळा रचून आरोपींची प्रतीक्षा केली. यावेळी शासकीय जंगल परिसरात दोन मोटारसायकली आढळून आल्या. वनकर्मचाºयांनी दबा धरून आरोपींची वाट पाहिली. काही वेळाने आरोपी जंगलातून बाहेर येत असताना राजेश हेमराज लाळे व आकाश मेहतर लाळे, दोघेही रा. सितासावंगी, यांना थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आकाश लाळे याने मोटारसायकल घटनास्थळी सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. रात्रीची वेळ असल्याने पाठलाग करूनही तो आढळून आला नाही.
दरम्यान, राजेश हेमराज लाळे याला पुढील चौकशीसाठी वनपरिक्षेत्र कार्यालय, नाकाडोंगरी येथे आणण्यात आले. चौकशीत त्याने स्वत:सह आणखी पाच जणांनी वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलात करंट लावून ठेवल्याची माहिती दिल्याचे वनविभागाने सांगितले. यानंतर ३० आॅगस्ट रोजी घटनास्थळाचा मौका पंचनामा करण्यात आला. तसेच फरार आरोपींचा शोध घेण्यात आला. या कारवाईदरम्यान आकाश मेहतर लाळे व पतीराम उदाराम मेश्राम यांना पकडण्यात वनविभागाला यश आले. सदर प्रकरणी वनविभागाने प्र.सु.री. क्र. ०३०७३/७६८२५, दिनांक ३० आॅगस्ट २०२६ अन्वये वनगुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध वनविभागाकडून सुरू असून, जंगल परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या करंटच्या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक भंडारा योगेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी गडेगाव आगार रितेश भोंगाडे, नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामटेके, क्षेत्र सहायक एस.एच. शेंडे, क्षेत्र सहाय्यक टि.एच घुले,वनरक्षक विठ्ठल नेवारे, वनरक्षक रंजना शेंडे, बिट रक्षक प्रविण पंचबुधे तसेच भंडारा वनविभागातील इतर वनकर्मचाºयांनी केली.