
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : नववर्षाचा पहिल्याच दिवशी शाळा उशीरा उघडल्याने तसेच शिक्षकही वेळेत न पोहचल्याने विद्यार्थ्यांना तब्बल एक तास शाळेबाहेर ताटकळत उभे राहावे लागल्याचा प्रकार तालुक्यातील छिपीया येथील जिल्हा परिषद शाळेत आज, १ जानेवारी रोजी समोर आला. या घटनेमुळे पालकवर्गात संताप व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासह त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विविध उपक्रम, कार्यक्रम व योजना राबविण्यात येत आहे. परंतु शालेय प्रशासन व ज्ञानदान करणाºया शिक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे शिक्षण विभागाचा उद्देशाला तडा जात असल्याचे अनेकदा जिल्ह्यात समोर आले आहे. असाच प्रकार, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी रोजी छिपीया येथे समोर आला.
छिपीया येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातवीपर्यंतचे वर्ग असून १३२ विद्यार्थी शिकत आहे. त्यातच संपूर्ण शाळेचा भार मुख्याध्यापकांसह तीन शिक्षकांवर आहे. दरम्यान, मुख्याध्यापक दोन दिवसांपासून रजेवर असल्याची माहिती आहे. शाळा सुरू होण्याची वेळ सकाळी १० वाजता असल्याने गुरूवारी विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहचले. परंतु शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप असतानाच शिक्षकही वेळेत शाळेत पोहचले नाही. त्यामुळे प्रवेशद्वाराची किल्ली कुणाकडे आहे, याची माहितीमिळू शकली नाही. परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेशद्वार उघडण्याची वाट पाहत तब्बल एक तास ताटकळत राहावे लागले. विशेष म्हणजे, शाळा उघडण्याची वेळ सकाळी १० वाजता असून १०.३० वाजता प्रार्थना होते. परंतु शाळाच वेळेवर न उघडल्याने शालेय प्रार्थनाही वेळेवर होऊ शकली नाही. दरम्यान किल्ली ११ वाजता मिळाल्यानंतर प्रवेशद्वार उघडले व विद्यार्थी आपआपल्या वर्गात जाऊन बसले. हा प्रकार गावात चर्चेला झाला असून शाळा प्रशासनाच्या बेजबाबदारपणाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.