दोन दिवसांपूर्वीच्या म्हशीच्या मृतदेहाजवळ नवीन जिवंत आमिष; कॅमेरा ट्रॅपद्वारे वाघाच्या हालचालींवर नजर
भंडारा पत्रिका/वार्ताहर
तुमसर वनपरिक्षेत्रात सुरू असलेल्या वाघ जेरबंद मोहिमेला आणखी वेग आला आहे. दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी वनविभागाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या म्हशीच्या मृतदेहाच्या ठिकाणी नवीन जिवंत आमिष (बेट) लावले. परिसराची गस्त घालत असताना मचाणाच्या उजव्या बाजूस सुमारे १० ते २० मीटर अंतरावर वाघाच्या ताज्या पाऊलखुणा आढळून आल्या. त्यामुळे वाघ याच परिसरात वावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आला असून पुढील मोहीम अधिक सतर्कतेने राबविण्यात येत आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी अजय उपाध्ये हे मचाणावर बसून देखरेख करीत आहेत.
या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी रहांगडाले, बायोलॉजिस्ट शुभम मोदनकर, भंडारा व तुमसर RRT पथक, नाकाडोंगरी रेंजचे वनपाल, वनरक्षक तसेच इतर वनकर्मचारी सहभागी आहेत. ACF रितेश भोंगाडे तसेच DCF योगेंद्रसिंग, भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली वाघ जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाघ वनविभागाच्या पथकाला सातत्याने हुलकावणी देत आहे. विशेषतः कोअर क्षेत्रात वाघाचा वावर अधिक असल्याचे दिसून येत असून या भागात तो गाय, म्हैस आदी पाळीव जनावरांची शिकार करीत असल्याने परिसरातील नागरिक व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वाघाच्या ताज्या पाऊलखुणा आढळल्याने वनविभागाने परिसरातील गस्त वाढविली असून कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वाघाच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. वाघाला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक सातत्याने प्रयत्नशील आहे.