शासकीय धान्य गोदाम फोडून ५.४१ लाखांचा तांदूळ लंपास

साकोलीत ३६१ कट्टे चोरीला; मागील शटरचे नट-बोल्ट काढून चोरांचा प्रवेश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

साकोली : लाखांदूर फाट्याजवळील शासकीय धान्य गोदाम फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ३६१ कट्टे तांदूळ लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीला गेलेल्या तांदूळची एकूण किंमत ५ लाख ४१ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नोंदविलेल्या तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे शासकीय धान्य गोदामाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

साकोली शहरातील लाखांदूर फाट्याजवळ शासकीय धान्य गोदाम असून या गोदामात शासनाच्या मालकीचा तांदूळ साठवून ठेवण्यात आला होता. गोदामाची पाहणी करण्याची जबाबदारी असलेले दीपक नानाजी चौधरी (४७, रा. लाखांदूर रोड, तलाव बोर्ड, साकोली) हे नियमित पाहणी करीत होते.

दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजल्यापासून ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गोदामाला लक्ष्य केल्याचे समोर आले. ३ ऑक्टोबर रोजी गोदामाची पाहणी करताना काही तांदळाचे कट्टे कमी असल्याचे दीपक चौधरी यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी गोदामातील तांदळाची मोजणी केली असता तब्बल ३६१ कट्टे गायब असल्याचे स्पष्ट झाले.

चोरट्यांनी गोदामाच्या मागील बाजूस असलेल्या बंद शटरचे नट-बोल्ट काढून आत प्रवेश केला आणि शासनाच्या मालकीचे तांदळाचे कट्टे चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रत्येक कट्ट्यात ५० किलो तांदूळ होता. त्यानुसार चोरीला गेलेल्या ३६१ कट्ट्यांची किंमत ५ लाख ४१ हजार ५०० रुपये आहे.

घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ७७०/२०२६ अन्वये कलम ३३१(३), ३३१(४), ३३४, ३०५(ई) भा.न्या.सं. २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चोरी करण्यासाठी वापरलेली पद्धत आणि गोदामात प्रवेशाचा मार्ग याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि किशोर मानकर करीत असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविली जात आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *