भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात खरीप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आणि पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. सततच्या पावसामुळे शेतशिवारातील धान पिकांसह इतर खरीप पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. धान पिकासाठी सध्या पीक वाढीचा महत्त्वाचा टप्पा सुरू असून, सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांना अपेक्षित सूर्यप्रकाश मिळत नाही. परिणामी काही भागात धान पिकावर करपा व खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्याने पिकांच्या मुळांवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धानासोबतच भाजीपाला व विविध फळपिकांवरही अल्प प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकºयांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत आहे. पिकांचे नुकसान वाढल्यास उत्पादनावर परिणाम होऊन खरीप हंगामातील अपेक्षित उत्पन्न घटण्याची भीती शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.