भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या समाजसुधार सहकारी पतसंस्था वाकेश्वरला सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘विदर्भ रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नागपूर येथील सॉलीटेअर हॉटेल अॅण्ड बँक्वेट येथे आयोजित भव्य सोहळ्यात महाराष्ट्राच्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते संस्थेचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला समाजसुधार पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष आजबले, उपाध्यक्ष प्रा. सुरज गोंडाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी सोमेश्वर मते , संचालक मंडळ सर्वश्री अनिल दिघोरे, निलकंठ कायते, विक्की जिभकाटे , यादोराव कुथे , रवि हलमारे , रुपेश जिभकाटे ,प्रशांत बांडेबुचे , बाळा राऊत , विनोद मुटकुरे, माणिक मस्के, चेतन घनमारे, माधुरी खरवडे , प्रमिला चोले ,सागर जगनाडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाºया अनेक नामवंत संस्था व व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला. समाजसुधार सहकारी पतसंस्थेने स्थापनेपासूनच ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आधार देण्याचे कार्य केले आहे. बचत, कर्जपुरवठा, आर्थिक नियोजन आणि विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. विशेषत: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने संस्थेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यासोबतच शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणीय क्षेत्रातही संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
संस्थेच्या प्रगतीमागे प्रामाणिक व दूरदृष्टी असलेले विश्वस्त मंडळ, समर्पित कर्मचारीवर्ग आणि पारदर्शक प्रशासन व्यवस्था यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या नियोजनबद्ध व पारदर्शक कारभारामुळे संस्थेने सहकार क्षेत्रात विश्वासाचे स्थान निर्माण केले असून संस्थेची वाटचाल उत्तरोत्तर प्रगतीकडे सुरू आहे. ‘विदर्भ रत्न पुरस्कार’ हा केवळ सन्मान नसून समाजसुधार पतसंस्थेच्या उत्कृष्ट कार्याची सामाजिक बांधिलकीची आणि विश्वासार्ह सहकार वाटचालीची पावती आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. संस्थेच्या या यशाबद्दल सभासद, हितचिंतक व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.