स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भंडारा शहरात सायकल जनजागृती रॅलीचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बायसिकल असोसिएशन भंडाराच्या वतीने रविवार, १६ आॅगस्ट रोजी शहरात सायकल जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. निरोगी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि सायकलचा दैनंदिन जीवनातील वाढता वापर याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या या रॅलीला सायकलपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हातात तिरंगी ध्वज घेऊन मोठ्या संख्येने सायकलपटू सहभागी झाल्याने शहरातील वातावरण देशभक्तीमय झाले होते. शहरातील बहिरंगेश्वर मंदिर परिसरातून सकाळी ८ वाजता सायकल रॅलीला सुरुवात झाली. बायसिकल असोसिएशनचे गौरव सेलोकर यांच्या नेतृत्वाखाली सायकलपटूंनी शहरातील प्रमुख मार्गांवरून भ्रमंती केली. बहिरंगेश्वर मंदिर येथून निघालेली रॅली खामतलाव चौकात पोहोचल्यानंतर पुढे राजीव गांधी चौक, गांधी चौक आणि शास्त्री चौक या मागार्ने मार्गक्रमण करीत पुन्हा खामतलाव चौकात दाखल झाली.

यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान सहभागी सायकलपटूंनी हातात तिरंगी झेंडे घेतले होते. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शहरवासीयांचेही लक्ष वेधले गेले. विविध वयोगटातील सायकलपटूंनी उत्साहाने सहभाग घेत सायकल चालविण्याचा संदेश दिला. बायसिकल असोसिएशनच्या या उपक्रमातून नागरिकांनी सायकलचा अधिकाधिक वापर करावा, आरोग्याची काळजी घ्यावी तसेच पर्यावरण रक्षणात आपला सहभाग नोंदवावा, असा संदेश देण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात पार पडलेल्या या सायकल जनजागृती रॅलीला सायकलप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *