भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेडा : बावनथडी प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रविवारी जुन्या सुसुरडोह (बीड टोला) येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो प्रकल्पग्रस्तांनी पाण्यात उतरून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी गणेश दिघे आणि तहसीलदार उपेश अंबादे यांनी स्वत:पाण्यात उतरून आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच सर्व मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांततेत समाप्त झाले.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे सुसुरडोह-सितेकसा येथे सर्व मूलभूत सुविधांसह संपूर्ण व वेळेत पुनर्वसनकरणे, शेतजमीन, घरे व इतर मालमत्तेची बाजारभावानुसार तात्काळ नुकसानभरपाई देणे, प्रकल्पग्रस्त तरुणांना प्रकल्पात तसेच इतर शासकीय योजनांमध्ये प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे आणि पुनर्वसित गावांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य केंद्र व शाळा यांसारख्या पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गोबरवाहीपोलीस ठाण्याचे ठाणेदार शरद शेवाळे, आंधळगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन राठोड, सिहोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय कसोधन, तुमसर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिवम विसापुरे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या दक्षतेमुळे आंदोलन पूर्णपणे शांततेत पार पडले. या आंदोलनाचे नेतृत्व पुनर्वसित समितीचे अध्यक्ष किशोर उईके यांनी केले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष भिमराव नैताम, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके, लक्ष्मीकांत सलामे, प्रभाताई पेंदाम, समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान अधिकारी प्रत्यक्ष पाण्यात उतरून प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा ऐकल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, आता शासनाकडून ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.