भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील एका अल्पवयीन पीडितेशी संबंधित गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास भंडारा पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे पूर्ण केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ दिवसांत ५७६ पानी दोषारोपपत्र मा. विशेष सत्र न्यायालय, भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे. पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक ६ आॅगस्ट २०२६ रोजी रोहीत संजय वासनिक (वय ३० वर्षे, रा. समता नगर, फेज-२, भंडारा) याच्याविरुद्ध अप.क्र. १६९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासामध्ये उपलब्ध प्रत्येक महत्त्वपूर्ण बाबीची शास्त्रोक्त, तांत्रिक आणि कायदेशीर पद्धतीने पडताळणी केली. घटनास्थळावरील परिस्थिती, भौतिक पुरावे, वैद्यकीय निष्कर्ष, इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच वैज्ञानिक तपासणीतून प्राप्त निष्कर्षांच्या आधारे सविस्तर पुरावे संकलित करण्यात आले. केवळ जबाबांवर अवलंबून न राहता वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात आल्याने दोषारोपपत्र तयार करताना तपासातील प्रत्येक महत्त्वाच्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी रोहीत संजय वासनिक यास कायदेशीर प्रक्रियेनुसार अटक करण्यात आली असून तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या संवेदनशील प्रकरणाची सुनावणी शक्य तितक्या जलदगतीने व प्रभावीपणे पूर्ण व्हावी, यासाठी मा. न्यायालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच प्रकरणाच्या प्रभावी न्यायालयीन कामकाजासाठी विशेष अभियोक्त्याची नियुक्ती करण्याबाबत संबंधित शासन प्राधिकरणाकडे प्रस्ताव व पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक नूरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष तपास पथकातील तपास अधिकारी श्रीमती ज्योतिका इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांच्यासह ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक व ६ पोलीस अंमलदारांनी तपासाची जबाबदारी पार पाडली. गंभीर गुन्ह्याच्या तपासात वेग, अचूकता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कायदेशीर प्रक्रियेचा समन्वय साधत अवघ्या २४ दिवसांत ५७६ पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याने भंडारा पोलिसांच्या तपासाची ही कार्यवाही महत्त्वपूर्ण ठरली आहे.पुढील कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.