आरोग्य विभागातील वाहनচালकाची राष्ट्रपतींकडे मागणी :: प्रशासनाकडून विनंतीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : आरोग्य विभागात मागील २१ वर्षांपासून कंट्राटी वाहनचालक म्हणून सेवा देणाऱ्या जितेंद्र मुलचंद डोंगरे यांनी इच्छामरणाची परवानगी मिळვიवी, अशी मागणी थेट राष्ट्रपतींकडे केली आहे. मोहगाव (देवी), ता. मोहाडी येथील रहिवासी असलेल्या डोंगरे यांनी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रपतींना निवेदन पाठविले असून, जिल्हा प्रशासनामार्फत त्यांची मागणी मांडली आहे. आरोग्य विभागात रात्रदिवस सेवा देऊनही आपली विनंती ऐकून घेतली जात नसल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
जितेंद्र डोंगरे हे सन २००५ पासून प्राथमिक आरोग्य केंद्र, पवनी, ता. जि. भंडारा येथे कंट्राटी वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य विभागात रात्रदिवस, अहोरात्र २४ तास सेवा देताना कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी कोरोना रुग्णांना ने-आण करण्याचे काम केले. या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शासन आणि जनतेची सेवा केल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना निवेदन
आपल्या मागणीची दखल घेतली जात नसल्याने डोंगरे यांनी आता थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी केली आहे. संबंधित निवेदनाची प्रती महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, भंडारा जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच भंडारा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, शासन आणि जनतेची सेवा करूनही आपल्या विनंतीकडे दुर्लक्ष होत असल्याचे भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण मानसिक तणावाखाली असून, आपल्या जीवनाबाबत निराशा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गावाजवळ बदलीची मागणी
डोंगरे यांचे मूळ गाव मोहगाव (देवी), ता. मोहाडी असून, त्यांच्या गावापासून वरठी हे गाव अगदी जवळ आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, वरठी येथे वाहनचालकाचे पद रिक्त असल्याने त्या ठिकाणी आपली नियुक्ती करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. यासंदर्भात त्यांनी २२ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, भंडारा येथील आरोग्य अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले होते. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या दोन वेळेस प्रत्यक्ष भेट घेऊन वरठी येथे नियुक्ती देण्याची विनंती केली. मात्र, आपकी मागणी मान्य करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. गावापासून दूर असलेल्या कार्यस्थळी जाणे आणि कुटुंबीयांना वेळ देणे यामध्ये अडचणी येत असल्याने वरठी येथे नियुक्ती मिळवी, अशी त्यांची अपेक्षा आहे. अनेक वर्षे सेवा करूनही आपली विनंती मान्य होत नसल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
१९ ऑक्टोबरला मुंबईत जाण्याचा इशारा
डोंगरे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, येत्या १० दिवसांत म्हणजेच १९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत इच्छामरणाबाबत परवानगी न मिळाल्यास मुंबई येथील आयुक्त कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आठवा मजला, आरोग्य भवन येथे जाऊन विष प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या गंभीर निवेदनामुळे आरोग्य विभागातील कंट्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या, त्यांच्या मागण्यांची दखल घेण्याची कार्यपद्धती आणि संबंधित प्रशासनाची जबाबदारी याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज
एका कर्मचाऱ्याने इच्छामरणाची मागणी करण्यापर्यंत मजल गाठल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. वरठी येथील रिक्त पदावर नियुक्ती देण्याची त्यांची मागणी नियमानुसार पूर्ण करता येऊ शकते का, याची तपासणी प्रशासनाने करणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या मानसिक स्थितीची दखल घेऊन त्यांच्याशी तातडीने संवाद साधणे गरजेचे आहे.