भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा-बघेडा : गोबरवाही परिसरात मागील अनेक दिवसांपासून एचपी (ऌढ) गॅसच्या अनियमित पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांना पहाटेपासूनच एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लावून उभे राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, गॅस सिलिंडरसाठी बुकिंग करूनही अनेक ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे पहाटे ५.३० वाजल्यापासून नागरिकांना रांगेत उभे राहण्याची वेळ का येत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बुकिंग केल्यानंतरही वेळेवर गॅस उपलब्ध होत नसेल, तर गॅस वितरण व्यवस्थेत नेमकी अडचण कुठे आहे? तसेच उपलब्ध गॅसचा साठा, ग्राहकांकडून झालेली बुकिंग आणि प्रत्यक्षात करण्यात आलेले वितरण यामध्येतफावत आहे का, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या समस्येची संबंधित अधिकारी, प्रशासन आणि जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गॅस एजन्सीकडे उपलब्ध असलेला साठा, ग्राहकांच्या बुकिंगची नोंद, वितरणाची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष ग्राहकांना झालेला पुरवठा याची तपासणी करून नागरिकांना नियमित व सुरळीत गॅस पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.