रामेश्वर राहांगडाले / भंडारा पत्रिका गर्रा/बघेडा : तुमसर तालुक्यातील पवनारखारी गट ग्राम पंचायती अंतर्गत येणाºया गणेशपुर गावात सौर ऊर्जेवर आधारित पाणी टाकी व पाणीपुरवठा यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत असून, लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेली योजना देखभालीअभावी धूळखात पडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गावातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने सौर ऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली. मात्र सौर यंत्रणा बंद पडल्याने संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्था प्रभावित झाली आहे. योजना बंद असताना तिची तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या योजनेसाठी नेमका किती निधी खर्च करण्यात आला?
कोणत्या शासकीय योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला? काम कोणत्या यंत्रणेमार्फत अथवा कंत्राटदारामार्फत करण्यात आले? तसेच योजनेच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची आहे, याचा संपूर्ण तपशील ग्रामस्थांसमोर सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे. सौर यंत्रणा बंद पडल्यानंतर वेळेत दुरुस्ती का करण्यात आली नाही? नागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष का केले? दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध असूनही योजना बंद का आहे? असे सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. योजनेवर खर्च करण्यात आलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब सार्वजनिक करावा, संबंधित अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणी करून योजनेची सद्यस्थिती तपासावी आणि दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच गणेशपुरातील पाणीपुरवठा योजना तातडीने दुरुस्त करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरू करावा. संबंधित अधिकारी व कर्मचाºयांच्या भूमिकेची चौकशी करून निष्काळजीपणा आढळल्यास जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.