भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) राजकारणात आज मंगळवार, १८ आॅगस्ट रोजी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. बाजार समितीचे सभापती भावराव उके आणि उपसभापती राजकुमार उर्फ ‘पप्पू’ पटले यांच्याविरुद्ध आणण्यात आलेला अविश्वास ठराव १५ विरुद्ध शुन्य मतांनी मंजूर झाला असून, दोन्ही पदाधिकाºयांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. एकूण १८ पैकी १५ संचालकांनी एकत्र येत अभूतपूर्व एकजुटता दाखवत अविश्वास ठरावाच्या बाजूने कौल दिला. मतदान अविश्वास ठरावावर चर्चा आणि मतदानासाठी उपविभागीय अधिकारी (SDO) चंद्रकांत खंडाईत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत उपस्थित १५ सर्व संचालक व संचालिकांनी हात उंचावून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. सभापती, उपसभापतींसह ३ जण अनुपस्थित या राजकीय घडामोडीत विशेष बाब म्हणजे ज्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला गेला होता, ते सभापती भाऊराव उके आणि उपसभापती राजकुमार पटले हे या बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यांच्यासोबत आणखी एक संचालक महेश अग्रवाल हे सुध्दाबैठकीस गैरहजर होते. ठरावाच्या बाजूने मतदान करणाºया १५ संचालकांमध्ये मुनेश रहांगडाले, धनंजय तुरकर, राजीव ठकरेले, ओमेश्वर चौधरी, चेतनकुमार बहेकार, राधाकृष्ण ठाकूर, सौ. कौशल तुरकर, सौ. शामकला पाचे, जितेश टेंभरे, पंकज यादव, मुरलीधर नागपुरे, धनलाल ठाकरे, अरुण गजभिये, सुमित भालोटिया आणि विजय उके यांचा समावेश आहे. १५ संचालकांच्या या अभूतपूर्व एकजुटी मुळे बाजार समितीतील सत्तेची गणिते पूर्णपणे बदलली असून आता नवीन नेतृत्वाच्या निवडीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.