भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया:- श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने गोंदिया शहर आज पूर्णपणे भक्तिमय झाले होते. ‘बम बम भोले, हर हर महादेव’ च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमले. हजारोच्या संख्येने भाविकांनी कावड यात्रा काढून वैनगंगा नदीचे पवित्र पाणी शंकराच्या पिंडीवर अर्पण केले. गोंदियाला लागून असलेल्या महाराष्ट्रमध्यप्रदेश सीमेवरील वैनगंगा नदीयेथून हजारो भाविकांनी सकाळीच पाणी भरून कावड उचलली. त्यानंतर तब्बल २५ किलोमीटरचा पायी प्रवास करत भाविक गोंदिया शहरातीलविविध मंदिरांतील शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी पोहोचले. शहरातील प्राचीन नागराधाम मंदिर, रेल्वे हनुमान मंदिर, गजानन मंदिर यांसह अनेक शिव मंदिरांवर सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. वातावरण पूर्णपणे शिवमय झाले होते. या कावड यात्रेत गोंदिया नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनीही हजारो नागरिकांसोबत सहभाग घेतला. खांद्यावर कावड घेऊन ते रेल्वे हनुमान मंदिरात पोहोचले आणि शिवपिंडीवर जल अर्पण केले. यावेळी बोलताना त्यांनी गोंदियावासीयांना सुख-समृद्धी लाभो अशी प्रार्थना देवाकडे केली. तसेच यापूर्वी पंढरपूरला सायकलवारी करताना त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना मुबलक पाणी मिळू दे अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.