ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये एकट्याचा प्रवास करणाऱ्या महिलेने दिला कन्येला जन्म!

◆ तुमसर रोड रेलवे स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांची तत्परता

◆ प्रसूती वेदना सुरू होताच महिलेला रुग्णालयात दाखल केले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

गर्धा-बघेडा : ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून एकट्याचा प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेला प्रवासादरम्यान अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. याची माहिती मिळताच तुमसर रोड रेलवे स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. स्थानकावरील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने महिलेला उपजिल्हा शासकीय रुग्णालय, तुमसर येथे दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आई आणि नवजात बालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. रेलवे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे महिलेला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली.

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३४ वाजता नागपूर येथील मंडळ सुरक्षा नियंत्रण कक्षाकडून तुमसर रोड रेलवे चौकीच्या प्रभारी अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. गाडी क्रमांक १२१०१ ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या बी-५ डब्यातील आसन क्रमांक ४० वर प्रवास करणाऱ्या महिलेला प्रसूती वेदना होत असल्याच्या या सूचनेने कळविण्यात आले.

माहिती मिळताच रेलवे चौकीचे प्रभारी उपनिरीक्षक एस. एस. डोंके आणि सहायक उपनिरीक्षक एस. के. गंगापारो यांनी सुरक्षा पथकासह प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर धाव घेतली. यावेळी स्थानकावरील पोर्टर आणि महिला सफाई कर्मचाऱ्यांनीही मदतीसाठी पुढकार घेतला.

सकाळी सुमारे १०.४० वाजता ज्ञानेश्वरी एक्सप्रेस तुमसर रोड स्थानकावर पोहोचताच संबंधित महिलेला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. त्यानंतर स्ट्रेचराच्या मदतीने तिला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा शासकीय रुग्णालय, तुमसर येथे नेण्यात आले. महिला सफाई कर्मचारीही तिच्यासोबत रुग्णालयात गेली.

रुग्णालयातील प्रसूती कक्षात महिलेला दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. यावेळी रेलवेच्या डॉक्टर डॉ. मीनाक्षी मलयवार उपस्थित होत्या. वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली महिलेची नैसर्गिक प्रसूती झाली. सकाळी ११.४५ वाजता तिने मुलीला जन्म दिला.

आई आणि नवजात बालकाची प्रकृती स्थिर असून, खबरदारीचा उपाय म्हणून दोघांनाही पुढील निरीक्षणासाठी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

संबंधित महिलेचे नाव शकीना खातून (वय ३०) असून, त्या पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बदुरिया येथील रहिवासी आहेत. त्यांचे पती अकबर अली मिर्झा आहेत. त्या मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शालीमारकडे जाणाऱ्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून प्रवास करीत होत्या.

घटनेनंतर महिलेचे पती अकबर अली मिर्झा आणि भाऊ अरिकुल खान यांना मोबाईलद्वारे माहिती देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर पतीने मुंबईहून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तुमसर येथे पोहोचणार असल्याचे कळविले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *