तुमसर रोड रेल्वे स्थानकवर मोठी दुर्घटना टळली; धावत्या ट्रेनमध्ये चढताना युवकाचा पाय कापला

 ◆ आरपीएफ जवानांची तत्परता ◆ जखमी युवकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले

भंडारा पत्रिका / तुमसर रोड रेल्वे स्थानकवर ५.३० वाजताच्या सुमारास दुर्गहून इतवारीकडे जाणाऱ्या इतवारी-दुर्ग लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना एका अज्ञात युवकाचा पाय घसरून तो रेल्वे रुळांच्या चपेटेत आला. या भीषण अपघातात युवकाच्या पायाचा पुढील पंजा कापला गेला. मात्र, घटनास्थळी उपस्थित रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी तत्परता दाखवत युवकाला तातडीने मदत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना युवकाचा अचानक तोल गेला आणि तो रेल्वे रुळांच्या दिशेने पडला. ही घटना लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या आरपीएफच्या जवानांनी क्षणाचीही विलंभ न करता घटनास्थळी धाव घेतली. सहायक उपनिरीक्षक (असक) शेखर गंगा पारी, आरक्षक प्रमोद कुमार आणि आरक्षक सुख नंदन फेवट यांनी तातडीने बचावकार्य करत जखमी युवकाला रुळावरून सुरक्षितपणे बाहेर काढले.

यानंतर आरपीएफच्या जवानांनी मानवतेचे दर्शन घडवत जखमी युवकाला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे युवकाला त्वरित वैद्यकीय उपचार उपलब्ध झाले.

आरपीएफ जवानांनी दाखवलेली तत्परता, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकी यामुळे संकटाच्या प्रसंगी जखमी युवकाला मदत मिळाली. धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. प्रवाशांनी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत धावत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *