भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात भावपूर्ण आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचे स्मरण करत या प्रसंगी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्व प्रमुख मान्यवरांनी एकत्र येत स्व. दादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. महाराष्ट्र राज्याच्या विकासातील स्व. अजित दादा पवार यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करत, राज्य सरकारने त्यांच्या जयंतीचा समावेश अधिकृतपणे राज्यातील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या शासकीय जयंती कार्यक्रम यादीत केला आहे.
सहकार क्षेत्रावरील त्यांची असलेली मजबूत पकड आणि या क्षेत्राच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले ऐतिहासिक कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. या आदरांजली कार्यक्रमाला भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील बा. फुंडे, अर्बन बँकेचे अध्यक्ष नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत वैरागडे, दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ नेते, संचालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. अजित दादांच्या प्रतिमापूजन करून व पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सहकारातील स्मृतींना उजाळा दिला.