दोन वर्षांनंतरही पडझडग्रस्तांना न्याय नाही!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : सन २०२३-२४ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. या आपत्तीत अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. घटनेनंतर ग्रामपंचायतीमार्फत पंचनामे करून नुकसानाची माहिती प्रशासनाकडे पाठवण्यात आली होती. पंचनाम्यानुसार अनेक घरांना अंदाजे ३०,००० रु. ते ४०,००० रु. इतके नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही प्रत्यक्षात मिळालेली मदत केवळ ४,००० रु. इतकीच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

नागरिकांचा संताप वाढला

नुकसानग्रस्त नागरिकांनी प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘पंचनाम्यात एक आकडा आणि मदतीत दुसरा आकडा’ हा न्याय आहे का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

घर पडझडग्रस्तांचा प्रश्न

पंचनाम्यातील ३०-४० हजार रुपयांच्या नुकसानीवर फक्त ४ हजार रुपयाची मदत का?, मदतीसाठी दोन वर्षांचा विलंब का झाला?, नुकसानभरपाईचे निकष नेमके कोणते?, मंजूर रक्कम आणि प्रत्यक्ष दिलेल्या मदतीतील तफावत का? असा प्रश्न घर पडझडग्रस्तांनी विचारला आहे.

आंदोलनाचा इशारा

पंचनाम्यानुसार योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, निकष जाहीर करावेत आणि अन्याय थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. दोन वर्षे प्रतीक्षा करूनही केवळ तुटपुंजी मदत मिळाल्याने नुकसानग्रस्त कुटुंबांचा संयम सुटत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती मदत द्यावी, अन्यथा परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *