शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सन २०२५-२६ या वर्षासाठी शासनाने जाहीर केलेला बोनस अद्याप प्रत्यक्षात घोषित केलेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. अधिवेशनादरम्यान धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अनेक महिने उलटूनही याबाबत शासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मागील हंगामाचा धान बोनस तातडीने जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेचा मोठा आधार असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या विविध अडचणी उभा ठाकल्या आहेत. हवामानातील बदल, वर्षासातील अनिश्चितता, पिकांवर होणारा रोगाचा प्रादुर्भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटत सापडला आहे. धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने पावसाच्या लहरीपणाचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे, त्यातच खोडकिड्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतित भर पडली आहे.
सन २०२४-२५ मध्ये राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देऊन आर्थिक मदतीचा हात दिला होता, त्यामुळे सन २०२५-२६ या वर्षासाठीही शासन बोनस जाहीर करेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. अधिवेशनात बोनस देण्याची घोषणा झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या, मात्र, अद्याप अधिकृत घोषणा न झाल्याने शेतकरी शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत.
दरवर्षी नापिकी, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, कोरडा दुष्काळ आणि विविध कीड-रोगांच्या संकटांना शेतकऱ्यांना सामore जावे लागते. उत्पादन खर्च सततने वाढत असताना शेतीमालाला मिलणारा मोबदला त्याप्रमाणात मिळत नसल्याची शेतकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे धान बोनस हा शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरू शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, शासनाने कर्जमाफी केली असल्याने यंदा बोनस मिळणार नसल्याचे सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडून सांगितले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
कर्जमाफीचा पैसा प्रामुख्याने बँकांच्या कर्जखात्यामध्ये समायोजिट होतो; त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष रोख मदत येत नाही, अशी भूमिका पक्षाने मांडली. शिवाय कर्जमाफीसाठी अटी-शर्ती असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेलच असे नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून शासनाने आश्वासनाप्रमाणे सन २०२५-२६ या वर्षाचा धान बोनस तातडीने जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने याबाबत तात्काळ निर्णय घेतला नाही, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवeden देताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपांडे, तालुकाप्रमुख तिलक साकोरे, शहरप्रमुख राकेश आग़्रे, शहर संघटक मयूर जोशी, प्रशांत देशमुख, उपतालुकाप्रमुख गुरुदेव साकुरे, उपशहरप्रमुख प्रकाश गभणे, राजेश ढवकर, विभागप्रमुख अनिरुद्ध गाढवे, नितेश गभणे, कृष्णा नागपुरे, हिमांशु भाजीपाले, संतोष चांदीवार, रोशन दहलकर, शामराव मालखंदळे, निलेश चामट यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनाची प्रतिलिपी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे आणि आमदार अनिल परब यांनाही देण्यात आली आहे.