नवेगावबांध जलाशयातून गाळ उपसा सुरू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी अर्जुनी-मोर. : तालुक्यातील नवेगावबांध येथील ऐतिहासिक जलाशयाची सिंचन क्षमता आणि जलसाठा वाढविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी पुन्हा एकदा कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी योजनेला खºया अर्थाने सार्थक ठरवत, यंदाही जलाशयातील गाळ स्वखर्चाने काढून वाहून नेण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी समीर बनसोडे यांनी नियमानुसार या खोलीकरणाला आणि माती वाहून नेण्यास अधिकृत परवानगी प्रदान केली आहे.

जनतेच्या या ऊर्जेमुळे नवेगावबांध परिसरात जलसंधारणाची एक नवी चळवळ उभी राहिली असून, भविष्यातही अशाच प्रकारे लोकसहभागातून आदर्श प्रकल्प राबविले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या अभूतपूर्व पुढाकारातून आणि उपविभागीय अधिकारी समीर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या जलाशयातून तब्बल ५ हजार ट्रॅक्टर ट्रॉली गाळाचा यशस्वी उपसा करण्यात आला होता. कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता, सुमारे १२ हजार ५०० घनमीटर गाळ उपसल्यामुळे जलाशयात १ कोटी २५ लाख लिटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला होता. याच यशस्वी उपक्रमाचा संदर्भ घेत यंदाही कामाला गती देण्यात आली आहे.

स्थानिक ट्रॅक्टर व जेसीबी मालकांचा पुढाकार

सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलाशयाची पाणीपातळी खालावली असताना, जलसाठा वाढविण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकाºयांच्या मंजुरीनंतर नवेगावबांध येथील जेसीबी आणि ट्रॅक्टर मालकांनी स्वत:हून आर्थिक भागीदारी करत कामाला सुरुवात केली आहे. स्वखर्चाने तलावातील गाळ व माती उपसून ती वाहून नेली जात आहे. यामुळे तलावाचे नैसर्गिक खोलीकरण होण्यास मदत होत आहे.

शेती, पिण्याचे पाणी आणि भूजल पातळीला मोठा फायदा

या खोलीकरणामुळे आगामी पावसाळ्यात नवेगावबांध जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त जलसाठा निर्माण होणार आहे. तलावात अधिक काळ पाणी साचून राहिल्याने परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची भूजल पातळी वाढेल. वाढलेल्या पाण्याच्या साठ्यामुळे पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकºयांना रब्बी व खरीप हंगामात सिंचनासाठी मोठी मदत होईल. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होऊन परिसरातील जैवविविधतेलाही चालना मिळेल.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *