■ उपसभापती प्रमोद मेंढे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव पारित
■ १३ विरुद्ध ० मतांनी प्रस्ताव मंजूर; उपसभापतींची अनुपस्थिती
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
पवनी : भंडारा जिल्ह्यातील पवनी पंचायत समितीमध्ये गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी राजकीय घडामोडी घडली. पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद मेंढे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव १३ विरुद्ध ० अशा मतांनी पारित करण्यात आला. या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी आयोजित विशेष सभेला स्वतः उपसभापती प्रमोद मेंढे अनुपस्थित होते.
पवनी पंचायत समितीच्या सभागृहात दुपारी २ वाजता ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी साई किरण नंदाला यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) नितेश माने यांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज पार पडले.
या सभेत हात वर करून मतदान घेण्यात आले. यावेळी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १३ सदस्यांनी मतदान केले, तर प्रस्तावाच्या विरोधात एकही मत पडले नाही. त्यामुळे १३ विरुद्ध ० अशा मताधिक्याने अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला.
या निर्णयामुळे पवनी पंचायत समितीच्या राजकीय वर्तुल्यात चर्चेला सुरुवात झाली आहे. अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया काय राहणार आणि पंचायत समितीच्या राजकारणात कोणते बदल घडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.