भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत अकस्मात मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भंडारा, वरठी, करडी, जवाहरनगर, तुमसर तसेच दिघोरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या विविध घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकरणांची पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून मर्ग दाखल केला असून वैद्यकीय अहवाल, पंचनामा व इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुडेगाव येथील गोविंदा बिसन राऊत (वय ६६) यांनी विषारी औषध प्राशन केले होते.
प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना लाखांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना ६ आॅगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या लेखी मेमोवरून भंडारा पोलीस ठाण्यात कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अन्वये मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार प्रकाश शेंडे करीत आहेत. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्पदंशामुळे सागर अनिलाल भलावी (वय २५, रा. निबंटोला, ता. तिरोडी, जि. बालाघाट) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तुमसर येथून भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातहलविण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचार सुरू असतानाच ५ आॅगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मेमोवरून मर्ग नोंद करण्यात आली असून पुढील तपास फौजदार प्रकाश शेंडे करीत आहेत.