भंडाऱ्यात अवैध रेती वाहतूक करणारा पिकअप पकडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील जलाराम चौक परिसरात अवैध रेती वाहतुकीविरुद्ध कारवाई करत भंडारा पोलिसांनी एका पिकअप वाहनासह एकूण ८ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहनचालक निशांत नरेश भेदे (वय २१ वर्षे, रा. खमाटा, ता. व जि. भंडारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, भंडारा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक जलाराम चौक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यावेळी संशयित पिकअप वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये अवैधरीत्या वाहतूक केली जात असलेली रेती आढळून आली.

पोलिसांनी एमएच-४९ एटी ९७२९ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप वाहन, अंदाजे किंमत ८ लाख ५० हजार रुपये, तसेच वाहनातील अंदाजे ७ हजार रुपयांची रेती आणि ४०० रुपये किंमतीचा लाकडी दांड्यासह पावडा असा एकूण ८ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात अप. क्र. २१९०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ३२१, ३२३ व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सारडा आणि पोलीस निरीक्षक भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास भंडारा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *