महापुराच्या संकटात आरोग्य पथकाची धाव; गर्भवती मातेला ‘माहेरघर’मध्ये सुरक्षित दाखल

पूराचा वेढा पडण्यापूर्वीच आरोग्य कर्मचाऱ्यांची तत्परता; संभाव्य धोका टळला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

देवरी : गेल्या दोन दिवसांपासून देवरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत आरोग्य विभागाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका गर्भवती मातेला वेळेवर सुरक्षित ठिकाणी हलवून ‘माहेरघर’ योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे संभाव्य मोठा धोका टळल्याची भावना व्यक्त होत आहे.

मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या फुक्कीमेटा उपकेंद्रातील सलियाटोला हे गाव सध्या पूरपरिस्थितीमुळे संपर्कहीन झाले आहे. या गावातील २५ वर्षीय गर्भवती माता रेखा भोलाराम मडावी यांची प्रसूतीची अपेक्षित तारीख ५ ऑक्टोबर होती. मात्र, गावाला पुराचा वेढा पडल्याने वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती.

ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकाने तातडीने पावले उचलली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता ताराम, समुदाय आरोग्य अधिकारी लता आवारी, आरोग्य सेविका मनीषा पडोळे, आरोग्य सेवक के. डी. फरदे, वाहन चालक विजय भेलावे आणि आशा सेविका लता उइके यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन गर्भवती महिला व तिच्या कुटुंबियांचे समुपदेशन केले. पुराचा धोका वाढण्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी हलविणे किती आवश्यक आहे, याची जाणीव करून दिल्यानंतर कुटुंबियांनीही सहमती दर्शविली.

त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी रेखा मडावी यांना सुरक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्र, मुल्ला येथील ‘माहेरघर’ योजनेअंतर्गत दाखल करण्यात आले. या योजनेद्वारे प्रसूती होईपर्यंत निवास, भोजन आणि नियमित वैद्यकीय तपासणीची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या संपूर्ण कार्यात मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील येरणे आणि डॉ. वंजारी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. आरोग्य विभागाच्या या तत्पर आणि नियोजनबद्ध कार्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोलहार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे तसेच देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित फुकडे यांनी पथकाचे अभिनंदन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *