इंजि. सजल राजाभोज यांच्याकडून शारदा विद्यालयाला ५० नग वाद्यसाहित्य व ५० लेझीमची भेट :: ज्या शाळेने घडविले, त्या शाळेसाठी काहीतरी करणे हेच खरे ऋणानुबंध!
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : विद्यार्थीदशेत ज्या विद्यालयाच्या प्रांगणात शिक्षणाचे धडे घेतले, संस्कारांची शिदोरी मिळाली आणि स्वप्नांना पंख मिळाले, त्या विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुढाकार घेणारा माजी विद्यार्थी खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी ठरतो। याच कृतज्ञतेचे सुंदर उदाहरण स्थानिक बजाज नगर येथील शारदा विद्यालयात पाहायला मिळाले।
विद्यालयाचे माजी विद्यार्थी इंजिनिअर सजल राजाभोज यांनी शाळेला ५० नग वाद्यसाहित्य व विद्यार्थ्यांसाठी ५० लेझीम भेट देऊन विद्यालयाच्या प्रगतीत मोलाची भर घातली।
इंजिनिअर सजल राजाभोज हे २०१३ चे माजी विद्यार्थी असून, त्यांनी अचानक विद्यालयाला भेट देत आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला। ‘याच शाळेत मी शिकलो, मोठा झालो। आज मी माझ्या पायावर उभा आहे, त्यामध्ये या विद्यालयाचा आणि माझ्या गुरुजनांचा मोठा वाटा आहे। त्यामुळे विद्यालयाच्या प्रगतीसाठी मला माझ्या परीने काहीतरी योगदान द्यायचे आहे,’ अशी कृतज्ञतापूर्ण भावना त्यांनी व्यक्त केली।
विद्यालयाचे प्राचार्य राहुल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ५० नग वाद्यसाहित्य व ५० लेझीमची आवश्यकता व्यक्त केली। माजी विद्यार्थी सजल राजाभोज यांनीही या गरजेचे महत्व जाणून घेत तत्परतेने शाळेला ही भेट दिली। त्यांच्या या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक, शारीरिक व कलात्मक विकासाला नवी चालना मिळणार आहे।
विद्यार्थ्यांना दिला यशाचा आणि संस्कारांचा मंत्र!
यावेळेस विद्यार्थ्यांशी संवाद साधताना इंजिनिअर सजल राजाभोज यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी JNU, IIT, NIT यांसारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्याचे स्वप्न पहावे, विविध क्षेत्रात आत्मविश्वासाने भरारी घ्यावी आणि यशाची उंच शिखरे गाठावीत, असे आवाहन त्यांनी केले।
केवळ उच्च शिक्षण आणि मोठे पद मिळवणे म्हणजे यश नव्हे, तर उत्तम चारित्र्य, गुरुजनांप्रती आदर, मोठ्यांचा सन्मान, राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा, सर्वधर्मसमभाव, नीटनेटकेपणा आणि संवेदनशीलता हे गुणही विद्यार्थ्यांनी अंगीकारले पाहिजेत। कारण या मूल्यांतूनच खऱ्या अर्थाने माणूस घडतो, असे त्यांनी स्पष्ट केले।
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून वाचनसंस्कृती जोपासावी, चांगल्या सवयी अंगीकारल्यात आणि स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार व्हावे, असा मौलिक संदेशही त्यांनी दिला। विद्यालय हे केवळ शिक्षण देणारे ठिकाण नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारे संस्कारमंदिर आहे, ही भावना त्यांच्या संवादातून अधोरेखित झाली।
कृतज्ञ माजी विद्यार्थ्याचा सन्मान
याप्रसंगी प्राचार्य राहुल डोंगरे यांनी इंजिनिअर सजल राजाभोज यांचा शाल, श्रीफळ व भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन सन्मान केला। प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनिअर बोपचे, श्रीराम शेंडे उपस्थित होते।
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बावनकर, प्रीती भोयर, सारिका आथोडे, अंकलेस तिजारे, नितू वर्षा घटारे, अशोक खंगार, सुकांक्षा भुरे, श्रेया उरकुडे, योगिता चोपकर, बेनिता रंगारी, किरण रामटेके, नेहा बारई, नेहा मते, राहुल राहंगडाले, अश्विन नवदेवे, दीपक बालपांडे, नारायण मोहनकर, ज्ञानेश्वरी सोनवणे व श्रीमती मानकर यांनी सहकार्य केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती भोयर यांनी केले, तर आभार सारिका आथोडे यांनी मानले।
शाळेच्या ऋणाची जाणीव म्हणजेच खऱ्या संस्कारांची पावती!
इंजिनिअर सजल राजाभोज यांची ही भेट केवळ साहित्याची देणगी नाही, तर आपल्याला घडविणाऱ्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पुढील पिढीच्या विकासात सहभागी होण्याचा आदर्श आहे। माजी विद्यार्थ्याने मिळविलेल्या यशाचा उपयोग आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी केला, तर शिक्षणसंस्थेचे संस्कार समाजात किती दूरवर पोहोचतात, याची प्रचीती येते। मोठे होऊन केवळ स्वतःचे आयुष्य घडवू नका; आपल्याला घडविणाऱ्या संस्थेच्या प्रगतीतही योगदान द्या, हा संदेश देणारा सजल राजाभोज यांचा उपक्रम शारदा विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे।