लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाची मोठी मजल
वैद्यकीय अधीक्षक, डॉ. दत्तात्रय ठाकरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये यांच्या मोलाच्या मार्गदर्शनातून रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेत सुवर्णपान
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
लाखांदूर : ग्रामीण भागातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा त्यांच्या परिसरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात आता अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेल्या ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’चा प्रभावी वापर केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून, या अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने अवघ्या एका आठवड्यात तब्बल ३६ यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडत लाखांदूर ग्रामीण रुग्णाल्याने आरोग्याच्या क्षेत्रात एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय लाखांदूर डॉ. दत्तात्रय ठाकरे यांच्या अहोरात्र परिश्रमातून हा ऐतिहासिक टप्पा गाठणे शक्य झाले आहे.
वैद्यकीय कौशल्याची कमाल; विविध आजारांवर यशस्वी उपचार
ग्रामीण रुग्णालयात आता सर्वसामान्यांसाठी हायड्रोसील, पोटाचे हर्निया, गर्भाशयाचे आजार व त्यावरील क्लिष्ट शस्त्रक्रिया, स्तनातील गाठी, तसेच शरीर-वरील विविध गाठींच्या यशस्वी शस्त्रक्रिया दर आठवड्याला नियमितपणे आणि अत्यंत सुरक्षित वातावरणात पार पाडल्या जात आहेत. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना मोठ्या शहरात उपचारासाठी जाण्याची आणि हजारो रुपयांचा खर्च करण्याची कटकट सुटली आहे.
डॉ. दत्तात्रय ठाकरेंची अहोरात्र मेहनत आणि सर्जन म्हणून उल्लेखनीय भूमिका
या संपूर्ण आरोग्यक्रांतीचे खरे शिल्पकार ठरते आहेत ते वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय लाखांदूर तथा निपुण सर्जन डॉ. दत्तात्रय ठाकरे. प्रशासकीय जबाबदारी लीलया पार पाडत असतानाच, स्वतः एक कुशल सर्जन म्हणून डॉ. ठाकरे यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये प्रत्यक्ष पाऊल ठेवून रुग्णांना जीवनदान देण्याचे व्रत स्वीकारले आहे. त्यांची चोवीस तासांची अहोरात्र मेहनत, रुग्णाविषयीची आत्मीयता आणि अचूक शल्यचिकित्सा कौशल्य यामुळे लाखांदूर ग्रामीण रुग्णालय आज या भागातील हजारो रुग्णांसाठी एक वरदान ठरले आहे.
डॉ. सौ. रोशनी राऊत (ठाकरे) यांचे जनसेवेचे व्रत
या अफाट लोकसेवेत डॉ. दत्तात्रय ठाकरे यांना खंबीर साथ लाभली आहे त्या, प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सौ. रोशनी राऊत (ठाकरे) यांची. स्त्रीरोगाच्या विविध समस्येने त्रस्त असलेल्या महिलांसाठी त्यांनी जनसेवेचा विडा उचलला आहे. ग्रामीण रुग्णालयात दर बुधवारी नियमितपणे भरणाऱ्या ‘मेनोपॉज आणि पीसीओडी क्लिनिक’च्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याच्या विविध तक्रारींवर प्रभावी उपचार केले जात आहेत. त्यांच्या या संवेदनशील आणि तत्पर सेवेमुळेच ग्रामीण रुग्णालयात महिलांच्या प्रसुतीचे आणि महिलाविषयक आरोग्याची काळजी घेण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. डॉ. रोशनी ठाकरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शेकडो महिलांना नवीन आरोग्यजीवन लाभले आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय ठाकरे आणि डॉ. सौ. रोशनी राऊत (ठाकरे) या डॉक्टर दांपत्याची जोडी आणि त्यांची संपूर्ण टीम आज लाखांदूर तालुक्यात आरोग्याची देवदूत ठरली आहे. एकाच छताखाली तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळणाऱ्या या मोफत व अत्याधुनिक उपचारांबद्दल लाखांदूर तालुका आणि परिसरातील नागरिकांमधून या दोन्ही डॉक्टरांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जात असून, त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वत्र कृतज्ञता व्यक्त होत आहे.