मोक्षधामात शिवशंकराची भव्य महाआरती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- श्रावण सोमवार आणि नागपंचमीचे औचित्य साधत गोंदियातील मोक्षधाम परिसरात रात्रीच्या सुमारास शिवशंकराची भव्य महाआरती करण्यात आली. या महाआरतीचे विशेष आकर्षण ठरले ते तृतीयपंथीयांचा सहभाग आणि महिलांची मोठी उपस्थिती. तृतीयपंथीयांनी शिवपिंडीवर अभिषेक करत विधिवत पूजा केली आणि त्यानंतर भक्तिभावाने महाआरती करण्यात आली. या महाआरतीला राज्यसभा खासदार राजेंद्र जैन, आमदार, नगराध्यक्ष सचिन शेंडे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. महाआरतीसाठी गोंदिया शहरासह परिसरातून हजारो भाविक मोक्षधामात दाखल झाले होते. विशेष म्हणजे रात्रीची वेळ असूनही महिला आपल्या लहान मुलांसह मोठ्या संख्येने याधार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. मोक्षधाम म्हटलं की अंत्यसंस्काराचं ठिकाण अशी सर्वसाधारण ओळख असते.

मात्र, सोमवारी रात्री गोंदियातील मोक्षधामाचे चित्र पूर्णपणे वेगळे होते. संपूर्ण परिसर भाविकांच्या गदीर्ने फुलून गेला होता. मोक्षधामात एखादा धार्मिक मेळावा भरला आहे की काय, असा भास निर्माण झाला होता. महाआरतीनंतर तृतीयपंथीयांनी विविध धार्मिक वेशभूषेत नृत्य सादर केले. महाकाली तसेच राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील नृत्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. हे नृत्य पाहण्यासाठ-ीही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गोंदियातील मोक्षधाम परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून, प्रशस्त आणि हिरवाईने नटलेल्या या परिसरात धार्मिक कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. महिला, लहान मुले, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि तृतीयपंथीयांसह हजारो भाविकांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या पर्वावर गोंदियाच्या मोक्षधामात झालेली ही महाआरती धार्मिक उत्साहा सोबतच सामाजिक समावेशकतेचा संदेश देणारी ठरली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *