भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील टेंभरी, विहीरगाव, खैरी/पट, मांदेड, सावरगाव, कुडेगाव तसेच परिसरातील गावांतील शेतकºयांनी कृषी पंपांना दिल्या जाणाºया रात्रीच्या वीजपुरवठ्याच्या वेळेत बदल करून दिवसा अथवा शेतकºयांना सोयीस्कर वेळेत वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरचे निवेदन गुरुवारी १६ जुलै रोजी लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले. प्राप्त निवेदनानुसार, महावितरणकडून कृषी पंपांसाठी यापूर्वी सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडे सहा या वेळेत वीजपुरवठा करण्यात येत होता. मात्र सध्या हा वेळ बदलून रात्री दोन ते सकाळी साडे दहा असा करण्यात आला आहे. या बदलामुळे शेतकºयांना मध्यरात्री शेतात जाऊन मोटारपंप सुरू करावे लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकºयांनी निवेदनात नमूद केले आहे की, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्रीच्या वेळी शेतात जाताना अंधार, सर्पदंश, विजेचा धक्का, वन्यप्राण्यांचा वावर तसेच इतर अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा परिस्थितीत एखादी दुर्दैवी घटना घडल्यास जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, शेतकºयांच्या हिताचा विचार करून कृषी वीजपुरवठ्याच्या वेळेत तातडीने बदल करावा आणि दिवसा किंवा शेतकºयांना सोयीस्कर वेळेत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक कार्यवाही करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
या निवेदनावर टेंभरी, विहीरगाव, खैरी/पट, मांदेड, सावरगाव, कुडेगाव तसेच परिसरातील शेतकºयांनी पाठिंबा दर्शविला असून कृषी वीजपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. शेतकºयांच्या सुरक्षिततेसह शेतीच्या कामांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शासन व महावितरण या निवेदनावर कोणता निर्णय घेतात याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. शिष्टमंडळात तहसीलदार वैभव पवार यांना निवेदन सादर करतेवेळी, प्रा. पि. एम. ठाकरे, पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत, माजी सरपंच मुनेश्वर दिवठे, विजय लक्ष्मी मिलचे उपसभापती लोचन पारधी, उपसरपंच निखिल बगमारे, माजी सरपंच होमराज ठाकरे, माजी उपसरपंच गोविंदराव बरडे यांसह शेतकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.