वनविभागाने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
भंडारा पत्रिका/वार्ताहर
गर्धा-बघेडा : परिसरात रानडुकरांचा हैदोस वाढला असून, शेतातील उभ्या धान पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतित सापडले आहेत. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणाामुळे शेतकरी संकटाचा सामना करीत असताना, दुसरीकडे रानडुकरांकडून धान पिकांची नासधूस होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे.
शेतात मेहनत करून पिकविलेल्या धान पिकांचे रानडुकरांकडून नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच शेतीचा वाढता खर्च, हवामानातील बदल आणि पिकांच्या उत्पादनाबाबतची अनिश्चितता यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच रानडुकरांच्या हैदोसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या समस्यकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी करावी, नुकसानीचा पंचनामा करावा आणि नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.