लोणारा येथील महासती बिनाबाई मंदिरात नवरात्रोत्सावाला उत्साहात प्रारंभ

५६१ घटज्योती प्रज्वलित; नवनिर्मित सभागृहाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन; स्त्रीशक्तीचा जागर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजा लोणारा येथील महासती बिनाबाई मंदिरात नवरात्रोत्सावाला रविवारी (दि. ११ ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये प्रारंभ झाला. यावेळी दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास विधिवत पूजाअर्चा करून तब्बल ५६१ घटज्योती प्रज्वलित करण्यात आल्या. या मंगलमय सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

नवरात्रोत्सावाच्या निमित्ताने देवस्थान समितीच्या वतीने घटस्थापनेसाठी स्वतंत्र नवनिर्मित सभागृह उभारण्यात आले आहे. या सभागृहाचे उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भाविकांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या या व्यवस्थेमुळे उत्सवाचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले.

यंदाच्या नवरात्रोत्सावाचे विशेष आकर्षण म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर. सकाळच्या पूजाअर्चेपासून दीपप्रज्वलन, नवनिर्मित सभागृहाचे उद्घाटन, प्रमुख अतिथींचे स्वागत, सूत्रसंचालन, आभारप्रदर्शन आणि प्रसाद वितरणपर्यंत विविध कार्यक्रमांची जबाबदारी देवस्थान समितीसह गावातील मुली आणि महिलांनी समर्थपणे सांभाळली. सर्व कार्यक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी महिलांनी जबाबदारीने केल्याने त्यांच्या कार्यक्षमतेचे आणि संघटनकौशल्याचे दर्शन घडले.

धार्मिक परंपरेचे जतन करतानाच महिलांना नेतृत्वाची संधी देणारा हा उपक्रम नवरात्रोत्सावाच्या स्त्रीशक्तीच्या संकल्पनेला साजेसा ठरला. गावातील महिला आणि मुलींच्या सक्रिय सहभागामुळे उत्सवाला विशेष रंग आला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य मोहन पंचभाई, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, सरपंच टेकेश्वरी दोनोंद, पोलीस पाटील सुरेंद्र भंडारकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भागवत हुकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सावाचा शुभारंभ झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. घटज्योतींच्या प्रज्वलनाने मंदिर परिसर भक्तिमय झाला असून, पुढील नऊ दिवस देवीच्या पूजाअर्चेसह विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. महासती बिनाबाई देवीवरील ग्रामस्थांची श्रद्धा, देवस्थान समितीचे नियोजन आणि महिला-मुलींचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे लोणारा येथील नवरात्रोत्सावाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *