वैनगंगा पुलावरील पथदिवे सुरू करा, खड्डे बुजवा ! शिवसेना (उबाठा) चे निवेदन; आंदोलनाचा इशारा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरालगत वैनगंगा नदीवरील पुलावरील गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करावेत तसेच पुलावरील मोठमोठे खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. त्याची प्रत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनाही देण्यात आली आहे.

भंडारा शहराजवळील वैनगंगा नदीवर सुमारे २० वर्षांपूर्वी अशोका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने हा पूल बांधला होता. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या पुलावरून पूर्वी मोठ्या प्रमाणात तसेच जड वाहनांची रात्रंदिवस वाहतूक होत होती. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली असली तरी परिसरातील गावांमधून रोजगार, व्यवसाय व इतर कामानिमित्त दररोज हजारो नागरिक भंडारा शहरात ये-जा करतात. मात्र पुलावरील पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी संपूर्ण पुलावर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे पायी जाणारे नागरिक, सायकलस्वार तसेच दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच पुलावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून, रात्रीच्या अंधारात हे खड्डे वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

टोल वसुली सुरू असताना पुलाची देखभाल व्यवस्थित केली जात होती. मात्र अशोका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची टोल वसुली बंद झाल्यानंतर पुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पुलाच्या मध्यभागी एका ठिकाणी जॉइंटही उघडा पडला असून, याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पुलावरील पथदिवे तातडीने सुरू करून खड्ड्यांची दुरुस्ती करावी तसेच उघड्या पडलेल्या जॉइंटचीही आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग विभागा विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

यावेळी शहर प्रमुख राकेश आंद्रे, शहर संघटक मयूर जोशी, प्रशांत देशमुख, उपशहर प्रमुख प्रकाश गभणे, हिमांशू भाजीपाले, नितेश गभणे, अथर्व समर्थ, राज वधवानी, शामराव मालखंडाळे, संतोष चांदीवार, अतुल मिरासे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *