
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शहरातील गणेश वार्ड मार्केट ओळ येथे रविवारी (दि. ५ एप्रिल) दुपारी सुमारे १:४० वाजता जुने तहसीलदार निवासस्थान परिसरात अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गर्दीची बाजारपेठ असल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती, मात्र नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि वेळीच दिलेल्या माहितीनंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतल्याने जीवितहानी टळली. आगीची माहिती मिळताच माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज यांनी नगरसेवक कुणाल राऊत, हेमराज राऊत व युवराज चौधरी यांच्या मदतीने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी परिसरातील राधा, सिद्धी, रिद्धी, दिया व तेज या लहान मुलांनीही पाण्याच्या बादल्या आणून आग विझविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. यानंतर नगरपरिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी निखिल अंबादे व पारस सूर्यवंशी यांच्या पथकाने अग्निशमन वाहनाच्या सहाय्याने पाईप लाईन लावून आग पूर्णत: विझवली. प्राथमिक माहितीनुसार, उच्चदाब विद्युत तारांमुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे वाळलेल्या झाडाला आग लागल्याचे समोर आले असून, श्री मेडिकलचे संचालक प्रकाश गजापूरे, व्यापारी राजेश उसगावकर व अनिल गुप्ता यांनी अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले.