शासकीय तांदूल चोरीचे धागेदोरे राईस मिलपर्यंत

  • बोलेरो पिकअपसह ५० टक्के धान्य जप्त

  • दोन दिवसांचा PCR, दुसऱ्या वाहनाचा शोध सुरू

  • सूत्रधार आणि प्रशासकीय यंत्रणेतील संभाव्य सहभाग तपासाच्या केंद्रस्थानी

१० जणांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

साकोली : लाखांदूर फाट्याजवळील शासकीय धान्य गोदामातून गोरगरिबांच्या वाटपासाठी ठेवलेले तब्बल ३६१ कट्टे तांदूल चोरीला गेल्याप्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. ५ लाख ४१ हजार ५०० रुपयांच्या या चोरीप्रकरणी पोलिसांनी दहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच ३५ एजे ५१७०) जप्त करण्यात आली आहे. चोरीच्या धान्यापैकी सुमारे ५० टक्के मालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. उर्वरित धान्य तसेच चोरीसाठी वापरलेल्या आणखी एका वाहनाचा शोध सुरू असून, तपास जसजसा पुढे जात आहे तसतशी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा केवळ चोरीचा प्रकार नसून त्यामागे मोठी साखळी कार्यरत होती का आणि तिचे सूत्रधार कोण, याचा छडा लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.

गोदाम व्यवस्थापक दीपक नानाजी चौधरी (४७, रा. लाखांदूर रोड, तलाव वार्ड, साकोली) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला. २९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपासून ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरट्यांनी गोदामाच्या मागील शटरचे नट-बोल्ट काढून आत प्रवेश केला. तपासणीदरम्यान ३६१ कट्टे कमी आढळले. प्रत्येक कट्टा ५० किलोचा असून चोरीच्या मालाची किंमत ५ लाख ४१ हजार ५०० रुपये आहे.

या प्रकरणात महेंद्र शिवचरण चौधरी, महेश विकास पुसाम, दीपक दवन वाघाडे, निकेश देवराम बावणकर व गोवर्धन चिंचुजी सयाम हे कोसमतोंडी परिसरातील; नारायण नामदेव गाहाणे वडेगाव येथील; संजयकुमार भैयालाल पुस्तोडे गिरोला-हेटी येथील; राकेश दयाराम आगासे साकोली येथील; प्रदीप नंदकुमार बोधनकर कोसमतोंडी येथील आणि रितेश रविशंकर जैस्वाल नवेगावबांध येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. संजयकुमार पुस्तोडे आणि रितेश जैस्वाल हे राईस मिल संचालक असल्याची माहिती असून, चोरीच्या धान्याच्या कथित खरेदी-विक्रीतील त्यांची भूमिका तपासली जात आहे. दरम्यान, सर्व आरोपींना न्यायालयासमोर करण्यात आले असता न्यायालयाने पोलिसांना पुढील तपासासाठी पुन्हा दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड (PCR) मंजूर केला आहे. उर्वरित धान्य कुठे आहे, दुसरे वाहन कोणाचे आहे, चोरीच्या मालाची वाहतूक व विक्री कोणामार्फत झाली आणि या साखळीत आणखी कौन सहभागी आहे, याचा तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर अ. मानकर करीत आहेत. पोलिसांनी गुन्ह्याच्या वेगाने छडा लावत आरोपींना ताब्यात घेणे, वाहन जप्त करणे आणि चोरीच्या धान्याचा काही भाग हस्तगत करणे यामुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. आरोपी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक मुरल हसन यांनी साकोली पोलीस ठाण्याला भेट देऊन ठाणेदार महादेव आचरेकर व तपास अधिकारी किशोर मानकर यांच्या तपासाचे कौतुक करून पुढील तपासाबाबत मार्गदर्शन केले.

मात्र, शासकीय गोदामातील धान्य चोरीला जाणे आणि नंतर ते राईस मिलपर्यंत पोहोचण्याच्या तपासातील धागा प्रशासनासाठीही गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे. गोदामातील साठा, देखरेख, वितरण व्यवस्था आणि चोरीच्या मालाच्या हालचालींवर कोणत्या स्तरावर नियंत्रण राहिले, याची चौकशी होणे आवश्यक ठरणार आहे. या कथित रॅकेटमधील मुख्य सूत्रधार कोण आणि प्रशासकीय व्यवस्थातेतील कोणाची भूमिका होती का, याचा छडा लावण्यासाठी पोलिसांचा तपास अधिक व्यापक होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *