शेतकºयांना दिलासा, मात्र जलसाठ्यावर प्रश्नचिन्ह कायम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जुलै महिन्याच्या अखेरीस आणि आॅगस्टच्या सुरुवातीला पावसाने तब्बल १५ दिवसांची विश्रांती घेतल्याने भंडारा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला होता. पावसाअभावी रखडलेली शेतीची कामे, कोमेजू लागलेली पिके आणि वाढती अनिश्चितता यामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला होता. मात्र, या चिंतेच्या काळानंतर रविवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावत जिल्हाभर दिलासा देणारी एन्ट्री केली. सकाळपासून अधूनमधून सुरू झालेल्या सरींनी दुपारनंतर जोर पकडत अनेक भागांत मुसळधार पावसाचे स्वरूप घेतले.

या पावसामुळे रखडलेल्या खरीप हंगामातील रोवणीच्या कामांना गती मिळाली असून शेतकरी पुन्हा जोमाने शेतीकामांकडे वळताना दिसत आहे. काही ठिकाणी आधीच रोवणी झालेल्या धान पिकांना या पावसाचा मोठा फायदा होत असून पिकांची वाढही समाधानकारकरीत्या होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या शेतकºयांच्या चेहºयावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत. तथापि, पिकांसाठी उपयुक्त ठरलेला हा पाऊस जलसाठ्याच्या दृष्टीने अद्याप पुरेसा ठरलेला नाही. जिल्ह्यातील धरणे आणि तलावांमधील पाणीसाठा अपेक्षेपेक्षा कमी असल्याने आगामी काळात पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विविध भागांमध्ये पावसाची तीव्रता असमान असून काही ठिकाणी चांगला पाऊस पडला असला तरी काही भाग अजूनही प्रतीक्षेत आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आॅगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचा जोर काहीसा कमी राहण्याची शक्यता असून त्यानंतर पुन्हा पावसाची तीव्रता वाढू शकते. याशिवाय ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे हवामानात अनिश्चितता कायम असल्याने प्रशासनासमोर पुढील नियोजनाचे मोठे आव्हान उभे आहे. एकीकडे या पावसामुळे खरीप हंगामाला संजीवनी मिळाली असली तरी दुसरीकडे जलसाठ्यांची अपुरी स्थिती, भविष्यातील संभाव्य अतिवृष्टी आणि हवामानातील बदल यांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि प्रशासन दोघांसाठीही पुढील काही आठवडे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *