भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : इस्लाम धर्माचे अंतिम पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांचा १५०१ वा जन्मोत्सव अर्थात ईद-ए-मिलादचा पर्व साकोली शहरात मुस्लिम बांधवांनी २६ आॅगस्ट रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला. इस्लामिक कॅलेंडरनुसार १२ रबी-उल-अव्वल, ५७० इसवीमध्ये सौदी अरेबियातील मक्का शहरात पैगंबर मोहम्मद साहेबांचा जन्म झाला. त्यांच्या शिकवणी, आदर्श जीवनपद्धती व आचरणाला इस्लाम धर्मात विशेष महत्त्व असून, त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेत जगभरातील मुस्लिम बांधव ईदए-मिलादचा पर्व श्रद्धेने साजरा करतात. साकोली येथील सिरतून नबी कमिटीच्या वतीने अजीमोशान ईद-ए-मिलाद जुलूसाचे आयोजन करण्यात आले. गौसिया अरबी मदरसा, शिवाजी वॉर्ड येथून जुलूसाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत जुलूस जामा मस्जिद येथे पोहोचला.
यावेळी मस्जिद कमिटी, दरगाह उर्स कमिटी, नगरसेवक नयन पटेल, प्रमोद गजभिये, सायली दोनोडे तसेच विविध सामाजिक मंचांच्या वतीने जुलूसाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सहभागी बांधवांना अल्पोपहार, मिठाई व शरबताचे वितरण करण्यात आले. जुलूसाचा समारोप हजरत बाबा भाईसाहेब यांच्या दरगाह येथे करण्यात आला. यावेळी शाही चादर व फुल अर्पण करून अमन, शांती, प्रेम, बंधुभाव व सामाजिक सद्भावनेसाठी विशेष दुवा करण्यात आली. दरम्यान, सिरतून नबी कमिटीच्या वतीने २५ व २६ आॅगस्ट रोजी शहरात भव्य लंगराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ईद-एमिलादच्या माध्यमातून सामाजिक एकता आणि परस्पर सौहार्दाचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष सय्यद एजाज, कार्यकारी सचिव मेहबूब शेख, हाजी सलीम खान, अकील शेख, आबिद पठाण, जुबेर शेख, सोहेल अली, नाशीत खान, विक्की खान, जामा मस्जिद अध्यक्ष शमीम अन्सारी, तसेच कलीम शेख, फाजिल खान, फहीम कुरेशी, जावेद शेख, इरफान शेख, इर्शाद पठाण, मोनू खान यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले. उत्साहपूर्ण वातावरणात जुलूसात सहभाग नोंदवत सर्वांनी ईद-ए-मिलादचा पर्व साजरा केला.