भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शहरातील नागरिकांसाठी धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा रस्त्यावर दोन अनोळखी इसमांनी स्वत:ला पोलिस असल्याचे भासवत शेतकरी गुलाब कापगते यांना अडवले. ‘दागिने घालून फिरू नका, चोरीच्या घटना सुरू आहेत,’ असा बनाव करून त्यांच्या अंगावरील १ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोने हातचलाखीने लंपास केले. विशेष म्हणजे, या घटनेच्या अवघ्या पाच मिनिटे आधी जगन उईके यांनाही याच संशयितांनी अडवून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडे दागिने किंवा रोख रक्कम नसल्याने ते बचावले. सलग दोन नागरिकांना लक्ष्य करण्याच्या या प्रकारामुळे साकोलीत ‘बनावट पोलिस’ टोळीच्या दहशतीची चर्चा सुरू झाली आहे. मंगळवारी (१८ आॅगस्ट) सकाळी साडेअकराच्या सुमारास तलाव वॉर्डाकडे जाणाºया कच्च्या रस्त्यावर ही घटना घडली. गुलाब छगन कापगते (५९) हे कापगते पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून मोटारसायकलने घरी जात होते. एकोडी चौकातून तलावाच्या दिशेने जात असताना रस्त्यात दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले.दोघांनी हेल्मेट व रेनकोट घातले होते, तर चेहरा रुमालाने झाकला होता. ‘आम्ही पोलिस आहोत. परिसरात सोन्याचे दागिने चोरीला जात आहेत. दागिने घालून फिरू नका,’ असे सांगत त्यांनी कापगते यांना दागिने काढण्यास सांगितले.
पोलिस असल्याच्या बतावणीवर विश्वास ठेवून कापगते यांनी गळ्यातील २० ग्रॅमची सोन्याची चैन आणि बोटातील ८ ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून दिली. भामट्यांनी दोन्ही दागिने कागदाच्या पुडीत बांधल्याचे नाटक केले आणि ती पुडी कापगते यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवली. त्यानंतर दोघे मोटा-रसायकलवरून एकोडी चौकाच्या दिशेने पसार झाले. काही अंतर गेल्यानंतर कापगते यांनी डिक्कीतील पुडी तपासली असता त्यात सोन्याऐवजी बनावट पिवळ्या धातूची चैन व अंगठी आढळली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जिल्ह्यातील जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही काही दिवसापूर्वी अशाच पद्धतीने बनावट पोलिसांकडून फसवणुकीची घटना घडल्याची माहिती आहे. त्यामुळे साकोलीसह जिल्ह्यात अशा पद्धतीने नागरिकांना लक्ष्य करणारे भामटे सक्रिय आहेत का, याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरले आहे. या प्रकरणी साकोली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६५५/२०२६ नुसार भा.न्या. संहितेच्या कलम २०४,३१८(४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक किशोर मानकर तपास करीत आहेत. संशयितांचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेने शहरातील नागरिकांनी अनोळखी व्यक्ती पोलिस असल्याचे सांगत दागिने काढण्यास सांगितल्यास सावध राहण्याची गरज आहे.