सेवा संकल्प अभियानातून शेवटच्या घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवा !

■ जि.प.उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांचे निर्देश ■ सेवा संकल्प व स्वच्छता ही सेवा अभियानाचा थाटात शुभारंभ ■ स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा गौरव, जि.प. परिसरात स्वच्छता श्रमदान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधि
भंडारा : भंडारा जिल्ह्यात महिनाभर सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची चांगली सुरुवात जिल्ह्यात झाली असून विविध विभाग उत्साहात कामाला लागलेले आहेत. शेवटच्या घटकांपर्यंत या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ पोहचवा असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांनी केले. भंडारा जिल्हा परिषदेच्या वतीने आज १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सेवा संकल्प व स्वच्छता ही सेवा अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, शिक्षण समिती सभापति नरेश ईश्वरकर, आरोग्य समिती सभापती आनंद मल्लेवार, जि.प. सदस्य विनोद बांते, जि.प.सदस्य यशवंत सोनकुसरे, जि.प.सदस्या सो. पटले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक सोळंकी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) संजय जोल्ले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) उमेश नंदगवळी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पानी व स्वच्छता) माणिक चव्हाण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संदीप बोरकर, कृषी विकास अधिकारी विकास सोनवाने, शिक्षणाधिकारी (प्राथ.) निर्मला माने, कार्यकारी अभियंता (बांधकाम) झाडे आदींची उपस्थिती होती.

उपाध्यक्ष फेंडर म्हणाले, सेवा संकल्प अभियानामध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. हे उपक्रम सर्वसामान्यांशी निगडीत आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणांनी सामान्य नागरिकांची गरज लक्षात घेता प्रभावी अंमलबजावणी करून या अभियानाचा उद्देश्य यशस्वी करावा, असे आवाहन केले. तर या प्रसंगी शिक्षण समिती सभापती नरेश ईश्वरकर म्हणाले, प्रत्येक अभियान हा शेवटच्या घटकांपर्यंत असतो. त्यांना त्या माध्यमातून लाभ मिळण्याची आशा असते. परंतु कधी अंमलबजावणी योग्य झाली नाही तर लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत लाभ देण्यासाठी यंत्रणांनी कार्य करावे अशा सुचना त्यांनी केल्या. स्वच्छता अनेक दशकांपासून केली जाते, परंतु त्यानंतरही जागृती करावीच लागत आहे. अनेक गावांना पुरस्कार सुद्धा मिळाला, परंतु जो पर्यंत प्रत्येक्याचे मन स्वच्छ होत नाही तोपर्यंत स्वच्छतेची महती सर्वदूर पाहुडणार नाही. त्यामुळे मन स्वच्छ करून सर्वांनी सेवा संकल्प व स्वच्छता ही सेवा अभियान यशस्वी करावे असे आवाहन श्री ईश्वरकर यांनी केले.

जिल्हाधिकारी सावनकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे यांचे मार्गदर्शन दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा संकल्प व १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. सेवा संकल्प अभियानादरम्यान आशीर्वादाचा दिवा उपक्रम, योजनांच्या पात्र लाभार्थ्यांचा शोध घेणे, वृक्षारोपण, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छता ही सेवा, आरोग्य संकल्प, पोषण विषयावर जनजापुरी, आपले सेवा सरकार केंद्रामार्फत सात दाखले देणे, करवसुली, स्वच्छता कचरा वर्गीकरण, मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत क्षमता बांधणी कार्यशाळा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, जल जन सेवा, शेतकरी सेवा, दिव्यांग प्रमाणपत्रे वितरण, शिष्यवृत्ती अर्ज सादर करणे, विकसित भारत संकल्प यात्रा, नागरिकांच्या यशोगाथा, नमो यशोगाथा, साहित्य निलेंखन व अभिलेख वर्गीकरण, जनसेवक महाकुंभाची सांगता आदि उपक्रम या अभियानादरम्यान राबविले जाणार आहेत. तर स्वच्छता ही सेवा अभियानादरम्यान २ ऑक्टोबर पर्यंत गावास्तरावर विविध स्वच्छतेशी निगडीत उपक्रम राबवून व्यापक जनजागृती केली जाणार आहे.

कार्रक्रमाचे प्रारंभ उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पानी व स्वच्छता) माणिक चव्हाण यांनी, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) उमेश नंदगवळी यांनी, सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सांगितली. याप्रसंगी जिल्हा परिषदेची स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे आवारात स्वच्छता श्रमदान करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेऊन परिसराची स्वच्छता केली. कार्यक्रमाचे संचालन उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्ले यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *