
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील सैलोटपार येथील ७८ वर्षीय वृद्धाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गंगाराम टिपूजी शेंडे असे मृत वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम शेंडे हे मुंडीकोटा येथून आपले काम आटोपून दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सायकलने आपल्या गावी सैलोटपारकडे परत येत होते. यावेळी येडमाकोट फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर ते काही वेळ रस्त्यावर जखमी अवस्थेत पडून होते. दरम्यान, रस्त्याने जाणाºया नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्याचा सल्ला दिला. गोंदियाकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा येथे आणण्यात आले. उपपोलीस निरीक्षक विजय मसराम यांनी पंचनामा करून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सैलोटपार येथील स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(अ)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपपोलीस निरीक्षक विजय मसराम करीत आहेत.