तहसीलदार व पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांचे देखरेखीखाली वेगवेगळ्या पद्धतीने पाणी काढण्याचा प्रयत्न
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
तिरोडा : तालुक्यातील बोदलकसा जलाशयास दिनांक १२ रोजी पडलेले भगदाड बुजवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने हे भगदाड बुजवणे शक्य नसल्याने जलाशयातील पाणी वेगवेगळ्या मार्गाने काढून धोका कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. युद्ध स्तरावर पाणी काढण्याचे काम सुरू असले तरी आधी पडलेले भगदाडाची माती वाहून गेल्याने भगदाड आणखी मोठे झाल्यास एकाएकी पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होऊन पाण्याचा वेग वाढल्यास नाला फुटून नाल्याचे पाणी आसपासचे गावात जाण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशावरून तहसीलदार तिरोडा एन. एम. ठाकरे यांचे मार्गदर्शनात काम सुरू असून आज दिनांक १३ रोजी निवासी जिल्हाधिकारी भय्यासाहेब बेहेरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख चौबे यांनी भेट दिली असून पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंता सोनाली चोपडे, सर्कल इंजिनियर राजेश पाटील, कार्यकारी अभियंता राजीव कुथेकर, उप अभियंता सी. बी. डोंगरे यांचे सह पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी जलाशयाचे पाणी काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. काल पडलेल्या भगदाडातून होणारा विसर्ग डावा कालवा, उजवा कालवा व आज ओव्हफलो रपट्याला काही छिद्र पाडून पाणी सोडण्यात येत असून यामुळे फुटलेले भगदाडातुन वाहणारे पाण्याचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या जवळपास ७० ते ७५ टक्के पाण्याची पातळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पाण्याची पातळी ५०% पर्यंत खाली आल्यास धोका टळणार असल्याचा अंदाज विभागातर्फे वर्तवण्यात येत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी धोका टळला नसल्याचे सांगण्यात येत असून परिस्थितीवर पाटबंधारे व महसूल विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत असून २४ तास धोकादायक जागी गस्त सुरू असल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली आहे.