भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमात राज्यातून प्रथम क्रमांक आणि जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून आदर्श ठरलेल्या तुमसर तालुक्यातील सोरना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर शिक्षकांच्या मागणीसाठी थेट जिल्हा परिषद भंडारा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शाळा भरवून आंदोलन करण्याची वेळ आली. शालेय गणवेशातील चिमुकल्यांनी हातात ‘आम्हाला शिक्षक द्या’, ‘शिक्षणाचा हक्क द्या’ असे फलक घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाने शिक्षण व्यवस्थेतील शिक्षकांच्या कमतरतेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. सोरना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
२०१८ मध्ये अवघे १६ विद्यार्थी असलेली आणि बंद होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेली ही शाळा मुख्याध्यापक मेश्राम आणि सहायक शिक्षक कैलास चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे आज राज्यभर आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. डिजिटल शिक्षण, आधुनिक वर्गखोल्या, आनंददायी शिक्षण पद्धती, स्वच्छ परिसर, विविध शैक्षणिक उपक्रम आणि पालकांचा वाढता सहभाग यामुळे शाळेची वेगळी ओळख निर्माण झाली. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात २०२४ मध्ये राज्यातून प्रथम क्रमांक आणि २०२५ मध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवत शाळेने मोठा मान मिळवला. दिल्लीहून आलेल्या पथकाने शाळेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून पाच मिनिटांचा माहितीपटही तयार केला होता. त्यामुळे सरकारी शाळांचा आदर्श नमुना म्हणून सोरना शाळेकडे पाहिलेजात आहे.
मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर सोमवार (३ आॅगस्ट) रोजी ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयातच शाळा भरवून अनोखे आंदोलन केले. जिल्हा परिषदेच्या आवारात विद्यार्थ्यांनी अभ्यास करत शिक्षकांची मागणी केली. “आम्हाला शिक्षक द्या”, “शिक्षणाचा हक्क द्या” अशा घोषणा आणि फलकांमुळे प्रशासनाची उदासीनता अधोरेखित झाली. शिक्षणात राज्य पातळीवर गौरव मिळविणाºया शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्ष कांसाठी आंदोलन करावे लागणे, ही शिक्षण व्यवस्थेसाठी चिंतेची बाब असल्याची भावना पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.