‘करा किंवा मरा’ पद्धतीने बीएलओ शिक्षकांवर कामाचा मारा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर२०२६) मोहिमेसाठी मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्त शिक्षकांना किमान एक महिन्यासाठी पूर्णवेळ कार्यमुक्त करण्यात यावे, अशी मागणी संबंधित शिक्षकांनी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा अध्यापनासह मतदार पुनरीक्षणाचे काम वेळेत व गुणवत्तापूर्ण करणे अशक्य होत असल्याची भावना शिक्षकांमध्ये व्यक्त होत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बीएलओंना घराघरांत जाऊन माहिती संकलन, अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी, स्कॅनिंग आणि मोबाईल अ‍ॅपवर माहिती अपलोड करणे अशी व्यापक जबाबदारी देण्यात आली आहे.

मात्र सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शाळेची जबाबदारी पार पाडल्यानंतर स्वत:ची वैयक्तिक कामे उरकून पुन्हा सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत मतदारांच्या भेटी घ्याव्या लागत असल्याने शिक्षकांवर प्रचंड मानसिक व शारीरिक ताण निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागातील नागरिक दिवसभर शेतीत असल्याने भेटीसाठी शिक्षकांना शाळेनंतरच अतिरिक्त वेळ द्यावा लागत आहे.एका महिन्यात काम पूर्ण करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा, प्रशासनाकडून परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये चिंता वाढली आहे. या ताणाचा परिणाम त्यांच्या मानसिकआरोग्यासह विद्यार्थ्यांच्या अध्यापनावरही होत असल्याची खेद व्यक्त केली जात आहे. मतदार पुनरीक्षणाची प्रक्रिया अचूक आणि वेळेत पूर्ण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी बीएलओ म्हणून नियुक्त सर्व शिक्षकांनाकिमान एक महिन्यासाठी पूर्णवेळ कार्यमुक्त करून त्याबाबत तातडीने स्पष्ट आदेश जारी करावेत, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

प्रशासनाकडे पर्याय

शासनाकडे पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, महसूल कर्मचारी आदी पर्याय उपलब्ध असतानाही वारंवार शिक्षकांवरच अशा स्वरूपाची अतिरिक्त जबाबदारी टाकली जाते. त्यामुळे शिक्षकांशी प्रशासनाची भूमिका ब्रिटिशकालीन दडपशाही सारखी असल्याची भावना शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *