जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभागांना नियोजन पूर्ण करण्याचे निर्देश
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने येत्या २४ ऑक्टोबर रोजी कायदेविषयक व विविध शासकीय व लोककल्याणकारी योजनांचा महाशिबिर (महामेळावा) आयोजित करण्यात येणार आहे. या महाशिबिराच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालय आज झालेल्या बैठकीला जिल्हा विदेशी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मिलिंद कुमार बुरांडे, अपर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण तसेच विविध विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
महाशिबिराच्या नियोजनासाठी प्रत्येक शासकीय विभागाने नोडल अधिकाऱ्याची नियुक्ति करावी. तसेच प्रत्येक विभागाने आवश्यक असलेल्या स्टॉलची संख्या तसेच शिबिरात लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची निश्चित यादी पूर्वीच सादर करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
नागरिकांना विविध शासकीय योजना तसेच कायदेविषयक मार्गदर्शन व सेवांचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. महाशिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने आणि गांभीर्याने काम करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.