दोन दिवसांपूर्वी पत्नीसोबत गावी आला होता; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
भंडारा पत्रिका/वार्ताहर गर््रा-बघेडा : तुमसर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर तसेच बावनथडी प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या खापा गावात एका ४१ वर्षीय इसमाचा मृतदेह त्याच्या शेतशिवारातील विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मदनलाल प्रेमलाल मरसकोले (वय ४१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मदनलाल मरसकोले हे मागील दोन वर्षापासून आपल्या सासरी राहत होते. दोन दिवसांपूर्वी ते पत्नीसोबत खापा येथे आले होते. त्यानंतर अचानक ते घरच्यातील व्यक्तींना काहीही न सांगता घराबाहेर पडले. बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.
शोध घेत असताना मदनलाल मरसकोले यांचा मृतदेह त्यांच्या शेतशिवारातील विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृत मदनलाल मरसकोले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गोबरवाही पोलीस ठाण्याचे प्रभारी थानेदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस हवालदार समित राहांगडाले पुढील तपास करीत आहेत.