गणेशोत्सवात ‘एक खिडकी’ अंतर्गत मिळणार सर्व परवानग्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या मिळविताना नागरिकांना होणारा त्रास व वेळेची नासाडी टाळण्यासाठी जिल्ह्यात ‘एक खिडकी’ यंत्रणा राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत गणेशोत्सव मंडळांना विविध परवानग्या मिळविण्यासाठी संबंधित कार्यालयांना स्वतंत्रपणे भेट द्यावी लागत होती. त्यामुळे अर्जदारांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या बाबत झालेल्या चर्चेनंतर सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून एकत्रित परवानगीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव मंडळांनी परवानगीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. अर्जामध्ये मंडळाचे नाव, नोंदणी क्रमांक, पदाधिकाºयांची माहिती, गणेशमूर्ती स्थापनेची जागा, विसर्जन मिरवणुकीचा दिनांक, वेळ व मार्ग, स्वयंसेवकांची यादी, आधारकार्डची प्रत तसेच आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक राहील.

गणेशमूर्ती स्थापनेची जागा खाजगी असल्यास जागा मालकाचा नाहरकत दाखला सादर करावा. तसेच आवश्यकतेनुसार धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतली असल्यास तिची प्रत अर्जासोबत जोडावी. ‘एक खिडकी’ यंत्रणेअंतर्गत संबंधित विभागांकडून आवश्यक नाहरकत प्रमाणपत्रे व कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस विभागाकडून ध्वनीक्षेपक व वाहतूक शाखेचे नाहरकत प्रमाणपत्र, नगरपरिषद अथवा ग्रामपंचायतीकडून नाहरकत दाखला व स्थानिक स्वराज्य संस्थेकडील शुल्क भरल्याची पावती, विद्युत विभागाकडून तात्पुरत्या विद्युत जोडणीची शुल्क पावती, आवश्यकतेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र तसेचअग्निशमन विभागाकडे अग्निसुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र सादर करावे लागेल. या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *