
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी/मोठी : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले घरकुल कोणतीही पूर्वसूचना अथवा योग्य प्रक्रिया न राबविता रद्द करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पंचायत समिती, लाखांदूर परिसरात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना लाखांदूर तालुकाप्रमुख विनोद ढोरे, संजय सोनटक्के, घरकुल लाभार्थी असलेल्या अनाथ मुली काजल, संजीवनी व कोमल, तसेच मंगेश प्रधान, शरद शहारे, विश्वास शहारे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. लाभार्थी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, गट ग्रामपंचायत गुंजेपार/किर्ही अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेल्या लाभार्थी कडू देवल सोनटक्के यांच्या घरकुलाची मंजुरी अचानक रद्द करण्यात आली. विशेष म्हणजे, या निर्णयापूर्वी कोणतीही नोटीस किंवा खुलासा मागविण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाºया कुटुंबावर अन्याय झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. निवेदनात संबंधित ग्रामसेवकाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, आर्थिक व्यवहार, निधी खर्च, लेखापरीक्षण आणि ग्रामपंचायतीतील कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करून लाभार्थी कुटुंबाला तात्काळ घरकुलाचा लाभ देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, या कुटुंबातील आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर तीन अनाथ मुली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहेत. अशा परिस्थितीत शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभही हिरावून घेतल्याचा आरोप होत असल्याने या प्रकरणाने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशा-रा दिला आहे की, मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या
लाभार्थी कुटुंबाला तात्काळ प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करावे. संबंधित ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई करावी. गट ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची व निधी खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करावी. भविष्यात कोणत्याही लाभार्थ्यावर असा अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने हमी द्यावी. दरम्यान, पंचायत समिती परिसरात सुरू असलेल्या या आमरण उपोषणाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले असून, प्रशासन या आंदोलनावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. यावेळी काजल सोनटक्के,संजीवनी सोनटक्के, कोमल सोनटक्के, संजय सोनटक्के, मंगेश प्रधान शरद सहारे, विश्वास मेश्राम, लोचन पारधी, गजानन दोनाडकर, मोरेश्वर तोंडरे, दिगंबर देशमुख, अश्विन सोनटक्के, मुरलीधर गिरे, सतीश बुरर्डे, लेकराम मेश्राम, रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत उपस्थित होते.