टिळक नगर येथील शिवमंदिर नूतनीकरणात अनियमितता?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरातील टिळक नगर भागातील दोन तलावांच्या मधोमध असलेले ऐतिहासिक व प्रसिद्ध शिवमंदिर सध्या स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि कंत्राटदाराच्या निकृष्ट कामामुळे दुरवस्थेत पोहचले आहे. दोन वर्षांपूर्वी या मंदिराच्या नूतनीकरणासाठी स्थानिक आमदारांच्या निधीतून ‘वैशिष्ट्यपूर्ण योजने’अंतर्गत तब्बल १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. एका स्थानिक कंत्राटदारामार्फत हे काम पूर्णही झाले, मात्र पहिल्या काही पावसाळ्यातच या कामाचा फोलपणा उघडा पडला आहे. या नूतनीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा गंभीर आरोप मंदिरातील मुख्य पुरोहित पंडित तिवारी यांनी केला आहे.

कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे आता पावसाळ्याच्या दिवसांत मंदिराच्या छतावरून मोठ्या प्रमाणात पाणी गळत आहे. थेट गर्भगृहात आणि मंदिर परिसरात पाणी साचत असल्याने दर्शनासाठी येणाºया भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा तर देवाचे दर्शन घेताना भाविकांच्या अंगावरच छतातून पाणी पडत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. दुरुस्तीचा केवळ फार्स; दर्शनीय भागातील पत्रे कोसळले कंत्राटदाराने केवळ मंदिराच्या दर्शनीय (समोरील) भागात काम करून उर्वरित मंदिर जैसे थे ठेवले आहे. त्यातच आता निकृष्ट कामामुळे मंदिराच्या दर्शनीय भागातील लावलेले पत्रे (पतळे) खाली कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे केवळ पैशांची उधळपट्टी झाली असून मूळ समस्या कायम आहे.लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही मंदिराची ही अवस्था झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आणि शिवभक्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

या कामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण गंभीर प्रकरणात स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे, संबंधित निकृष्ट काम करणाºया कंत्राटदाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि मंदिराच्या छताची दुरुस्ती तातडीने करून भाविकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी आता स्वराज युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *