भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : सौरऊर्जेचा वाढता वापर आणि केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डी. एन. पॉवर ग्रीन एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक (एम.डी.) दिलीप चौधरी आणि संचालक निशा चौधरी यांना ‘विदर्भ रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. नागपूर येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा उसगावकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. वाढत्या वीजबिलांच्या पार्श्वभूमीवर सौरऊर्जा हा प्रभावी आणि किफायतशीर पर्याय ठरत आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या अनुदानाचा (सबसिडीचा) लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डी. एन. पॉवर ग्रीन एनजीर्ने विशेष प्रयत्न केले. विदर्भात मोठ्या प्रमाणावर सोलर प्रकल्प उभारून अनेक ग्राहकांना योजनेअंतर्गत अनुदान मिळवून देण्यात कंपनीला यश आले आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलीप चौधरी यांनी हा सन्मान केवळ स्वत:चा नसून, कंपनीतील सर्व कर्मचारी, सहकारी आणि मित्रपरिवार यांच्या सामूहिक परिश्रमाचे फळ असल्याचे सांगितले. तसेच, भविष्यातही अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या सन्मानाबद्दल डी. एन. पॉवर ग्रीन एनर्जीच्या कार्याचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, सौरऊर्जा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे कौतुक होत आहे.