तुमसरला स्वतंत्र जिल्ह्यााचा दर्जा द्या

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : तुमसर जिल्हा बनाओ अभियान समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) यांची भेट घेऊन तुमसरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी समितीने मागणीचे निवेदन सादर करत तुमसरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने स्वतंत्र जिल्हा निर्मितीची आवश्यकता सविस्तरपणे मांडली. निवेदनात नमूद करण्यात आले की, आदिवासीबहुल असलेल्या तुमसर परिस- रातील नागरिकांना जिल्हा मुख्यालय भंडारा येथे जाण्यासाठी सुमारे ९० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. जंगल परिसरामुळे दळणवळणात अनेक अडचणी निर्माण होतात. तसेच दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेअंतर्गत तुमसर रोड जंक्शन हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून येथून मुंबई, हावडा, दिल्ली व बालाघाटकडे रेल्वे सेवा उपलब्ध आहे. याशिवाय तुमसर हे मँगनीज उद्योग, मँगनीज खाणी आणि तांदूळ बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असल्याने स्वतंत्र जिल्हा झाल्यास पर्यटन, उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल, असे समितीने स्पष्ट केले.

यावेळी गोबरवाही, सिहोरा आणि करडी या भागांना स्वतंत्र तहसीलचा दर्जा देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. या मागणीची अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गंभीर दखल घेत भंडारा जिल्हाधिकारी सावनकुमार यांना तुमसर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समितीने दिली. यानंतर तुमसर तहसील कार्यालयाच्या परिसरात अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या हस्ते आम्रवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षलागवडीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या प्रसंगी तुमसर जिल्हा बनाओ अभियान समितीचे अध्यक्ष डॉ. किशोर चौधरी, कार्याध्यक्ष शंकरदादा बडवाईक, सचिव सीताराम जोशी वल्लभ, उपाध्यक्ष बेनीश्याम खंडेलवाल, संघटक खुशाल नागपुरे, अ‍ॅड. दिलीप भोयर, अ‍ॅड. रोहित बॉम्बार्डे, हर्षल खडसे, बंडू बागस्वार, नगरसेवक गुलराज कुंदवानी, उपविभागीय अधिकारी अंजली भोसले, परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी गणेश दिघे, तहसीलदार उपेश अंबादे , गटविकास अधिकारी नंदकुमार वालेकर, नायब तहसीलदार संजय जांभुळकर, दुय्यम निबंधक आर. पी. बोरकर, सहायक निबंधक प्रमोद हुमणे, जेडीआर अनिल कपले (भंडारा), उपअधीक्षक, भूमी अभिलेख हरिदास नारनवरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *