भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी तुमसर पोलिसांनी मागील दोन महिन्यांत विविध अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. दि. १ जून ते २१ आॅगस्ट २०२६ या कालावधीत अवैध रेती चोरी व वाहतूक, दारू विक्री, जुगार, मटका तसेच सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात सातत्याने कारवाई करण्यात आली. या कालावधीत अवैध रेती चोरी व वाहतूक प्रकरणी १७ गुन्हे दाखल करून २४ आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत रेती व रेती वाहतुकीची वाहने असा एकूण १ कोटी ३३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध दारूबंदी कायद्यांतर्गत ३७ गुन्हे दाखल करून ३९ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणांमध्ये १४ लाख ५८ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार प्रकरणांत २० गुन्हे दाखल करून २९ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, ५४ हजार ३२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, सुगंधित तंबाखू विक्रीविरोधातही पोलिसांनी कारवाई करत ३ गुन्हे दाखल करून ४ आरोपींवर कार- वाई केली. या कारवाईत १ लाख ३९ हजार ९२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५६ अन्वये ५, कलम ५५ अन्वये १ आणि कलम ५७ अन्वये १ असे एकूण ७ हद्दपारीचे प्रस्ताव मंजूर करून संबंधितांना हद्दपार करण्यात आले आहेत. तसेच कलम ५६ व ५७ अन्वये ३ आणि एमपीडीए कायद्यान्वये १ असे एकूण ४ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान दारू, जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, रेती वाहतूक करणारी वाहने तसेच इतर साहित्य जप्तकरण्यात आले.
अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे (अतिरिक्त कार्यभार, तुमसर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तुमसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. अवैध धंद्यांविरोधातील ही कारवाई पुढील काळातही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी आपल्या परिसरात कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन तुमसर पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.