दोन दशकांपासून भक्तीचा जागर, समाजप्रबोधनाचा ध्यास!

◆ ना मानधनाची अपेक्षा, ना प्रसिद्धीचा हव्यास!

◆ प्रीती महिला भजनी मंडळ, विरली/खुर्दचा प्रेरणादायी प्रवास

◆ २० वर्षांत २०० हुन अधिक भजन कार्यक्रमांतून निःशुल्क सेवा

अभिमन ठाकरे / भंडारा पत्रिका

लाखांदूर : भक्तीचा मार्ग केवळ ईश्वरभक्तीपुरता मर्यादित नसून, तो समाजाला योग्य दिशा देण्याचेही प्रभावी माध्यम आहे. याच विचाराला कृतीची जोड देत विरली/खुर्द येथील प्रीती महिला भजनी मंडळाने गेल्या जवळपास दोन दशकांपासून भक्तिसाधाना आणि समाजप्रबोधनाचा वसा जपला आहे. कोणत्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता गावोगावी भजनाच्या माध्यमातून आध्यात्मिक विचारांची पेरणी करणाऱ्या या महिलांचे कार्य खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळून समाजासाठी वेळ देणे, हीच मोठी गोष्ट आहे. मात्र, प्रीती महिला भजनी मंडळातील महिलांनी आपल्या भक्तीला सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे. गेल्या सुमारे २० वर्षांत या मंडळाने २०० हुन अधिक भजन कार्यक्रम सादर करत अनेक गावांपर्यंत भक्ती आणि समाजप्रबोधनाचा संदेश पोहोचवला आहे.

समाजात अनेक उपक्रम सुरू होतात; मात्र ते दीर्घकाळ सातत्याने सुरू ठेवणे हे खरे आव्हान असते. प्रीती महिला भजनी मंडळाने जवळपास २० वर्षे आपल्या कार्यात सातत्य राखत या आव्हानांना सामore जाण्याचा आदर्श निर्माण केला आहे. कोणताही मोठा गाजावाजा न करता, प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता आणि आर्थिक लाभाचा विचार न करता समाजासाठी योगदान देणे, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. ज्येष्ठ महिलांनी सुरू केलेला हा भक्तीचा प्रवास आज अकरा महिलांच्या सहभागातून पुढे जात असून, भविष्यातही ही परंपरा अशीच कायम राहावी, हीच अपेक्षा. सध्या प्रीती महिला भजनी मंडळात ११ महिला कार्यरत आहेत. माया केरवार, शिला खरकाटे, शीतल पारधी, निरंजना सांडस्कर, लक्ष्मी पारधी, कल्पना भुरले, शारदा पारधी, हिरा प्रधान, छाया कावळे, पुष्पा राऊत आणि कविता सौंदस्कर, या सर्व महिला एकजुटीने मंडळाचे कार्य पुढे नेत आहेत. प्रत्येक महिलेचा सहभाग, भक्तीवरील श्रद्धा आणि सामाजिक कार्याची ओढ यामुळे मंडळाची परंपरा आजही टिकून आहे. भक्ती, एकजूट, निःस्वार्थ सेवा आणि समाजप्रबोधन यांचा सुंदर संगम असलेले प्रीती महिला भजनी मंडळ हे विरली/खुर्द परिसरातील महिलांच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

ज्येष्ठ महिलांनी लावलेला सेवाकार्याचा वटवृक्ष!

या भजनी मंडळाची सुरुवात सुमारे २० वर्षांपूर्वी काही ज्येष्ठ महिलांनी एकत्र येऊन केली. भक्तीची आवड, अध्यात्मावरील श्रद्धा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ या भावनाेतून त्यांनी भजनी मंडळाची स्थापना केली. सुरुवातीला मर्यादित स्वरूपात सुरू झालेल्या या उपक्रमाने काळांतराने व्यापक स्वरूप धारण केले. काळा पुढे सरकत गेला. काही ज्येष्ठ महिला वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे कार्यापासून दूर झाल्या, तर काहींचे निधन झाले. मात्र, त्यांनी पेटविलेली भक्तीची ज्योत विसू दिली नाही. नव्या महिलांचा सहभाग वाढत गेला आणि मंडळाचे कार्य सातत्याने सुरू राहिले. जुन्या पिढीने सुरू केलेली ही भक्तीची परंपरा आजच्या नव्या पिढीतील महिलांच्या सहभागातून पुढे नेली जात आहे. समाजसेवेच्या आनंदासमोर मोबदल्याची अपेक्षा नाही

भजन हा केवळ मनोरंजनाचा किंवा धार्मिक कार्यक्रमाचा भाग नसून, तो समाजाला संस्कार, सद्विचार आणि नैतिक मूल्यांची जाणीव करून देण्याचा मार्ग आहे. हीच भावना मनात ठेवून प्रीती महिला भजनी मंडळाच्या महिला विविध गावांमध्ये भजन कार्यक्रम सादर करतात. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या कोणत्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता निःशुल्क सेवा देतात. भक्तीगीतांच्या माध्यमातून वातावरण भक्तीमय करणे, समाजात चांगल्या विचारांची रुजवण करणे आणि लोकांना अध्यात्मिकेशी जोडणे, हा त्यांच्या कार्यामागील मुख्य उद्देश आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *